Ganpatipule : गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावरील संरक्षण भिंतीला मोठ्या प्रमाणात तडे

गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र व निसर्गरम्य पर्यटनस्थळ असलेल्या गणपतीपुळे येथील समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या संरक्षण भिंतीला गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात तडे गेले आहेत. त्यामुळे संरक्षण भिंतीचे दगड समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात पसरलेल्या स्थितीत दिसून येत आहेत. गणपतीपुळे येथील समुद्र किनाऱ्यावर गेल्या दहा ते पंधरा वर्षांपूर्वी मेरिटाईम बोडनि लाखो रुपये खर्च पायऱ्या पायऱ्यांची संरक्षण भिंत बांधली. परंतु या संरक्षण भिंतीचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने गेल्या काही वर्षांपूर्वी या भिंतीचा एका बाजूला भाग ढासळला होता.

मात्र, आता संपूर्ण संरक्षण भिंतीला ठिकठिकाणी तडे जाऊ लागले आहेत. या भिंतीला समुद्राच्या मोठमोठ्या लाटांचा तडाका बसून तडे गेले आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात समुद्राच्या लाटांनी गणपती मंदिरानजीकच्या विश्रामगृहासमोर असलेल्या संरक्षण भिंतीचा भाग ढासळून टाकला आहे. याबाबत अद्याप संबंधित मेरिटाईम खात्याकडून कुठलीही दखल घेतली गेली नाही. तसेच संबंधित खात्याचा एकही अधिकारी या ठिकाणी फिरकत नसल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबत योग्य ती कार्यवाही हाती घेऊन नव्याने संरक्षण भिंतीचे काम करणेबाबत किंवा त्याची दुरुस्ती करण्यासाठी ठोस कार्यवाही हाती घेण्याची गरज आहे. मात्र, अशी कुठलीही कार्यवाही संबंधित खात्याकडून हाती घेतली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सध्या पावसाळ्याचे दिवस असताना येथील विश्रामगृह समोरच्या किनारा परिसरात मोठ्या प्रमाणात संरक्षण भिंतीचे दगड पसरलेले दिसून येतात. त्यामुळे या ठिकाणी फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांना फिरताना अडथळा निर्माण होतो. तसेच याच भिंतीवरून अनेक पर्यटक गणपती मंदिराच्या परिसराकडे जाण्यासाठी ये जा करीत असतात. या भिंतीला मोठ्या प्रमाणात तडे गेल्याने अनेक पर्यटकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:15 AM 06-Sep-2025