दापोली : दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठात होत असलेली कर्मचारी भरती प्रक्रिया ही आर्थिक देवाणघेवाणीतून होत असल्याचा चर्चेचा विषय असताना ही कर्मचारी भरती प्रक्रिया पारदर्शक व्हावी यासाठी दापोलीतील आघाडीच्या घटक पक्षांनी बुधवारी कुलगुरू डॉ. संजय भावे यांची भेट घेऊन चर्चा करून त्यांना निवेदन दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांना जमिनी देणारे अनेक शेतकरी सामान्य कुटुंबातील आहेत. त्यांना या भरती प्रक्रियेतून आशेचा किरण दिसत होता. ही भरती प्रक्रिया खास प्रकल्पग्रस्तांसाठी राबविण्यात येत आहे. अशावेळी विद्यापीठाने अधिग्रहीत केलेली जमीन ही प्रत्येक प्रकल्पग्रस्तांची कमी-अधिक प्रमाणात आहे. अशावेळी ज्यांची जमीन जास्त अधिग्रहीत झाली आहे त्यांना खरंतर प्रथम न्याय द्यायला हवा व त्यांची प्रथम निवड व्हायला हवी. असे असतानासुध्दा ज्यांचे जमीन क्षेत्र जास्त गेले आहे अशांना डावलून काही हितसंबंधियांनी यात हस्तक्षेप करून, ज्यांची काही गुंठ्यात जमीन गेली आहे त्यांची वर्णी लावण्याचा घाट घातला आहे व ज्यांची एकरात जमीन गेली आहे असे प्रकल्पग्रस्त मागे राहिले आहेत.
गेली अनेक वर्षे विद्यापीठात रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांना कायमस्वरूपी नोकरी मिळण्यापासून वंचित ठेवण्याचा कुटील डाव आखला आहे. तरी यात आपण लक्ष घालून जमिनीच्या क्षेत्रानुसार प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य द्यावे, त्याचप्रमाणे जे प्रकल्पग्रस्त असून गेली अनेक वर्षे विद्यापीठात रोजंदारीत काम करत आहेत अशा प्रकल्पग्रस्तांना प्रथम न्याय देऊन मगच इतरांचा विचार व्हावा, अन्यथा आम्हाला आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल असे आघाडीच्या घटक पक्षांनी कुलगुरू यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी दापोली उद्धव ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर, सचिव नरेंद्र करमरकर, माजी नगराध्यक्ष ममता मोरे, संदीप चव्हाण, विक्रांत गवळी, अनिल जाधव, रमेश भैरमकर, डॉ. रमेश पांगत, विलास कलमकर, तृशांत भाटकर, रमाकांत शिंदे, ज्योती विचारे, सिंधू भाटकर, तर शरद पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष सचिन तोडणकर, रवींद्र कालेकर, काँग्रेस पक्षाचे श्रीकांत मुंगशे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
भरती प्रक्रिया झालेय न्यायप्रविष्ठ
कोकण कृषी विद्यापीठात २४९ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. त्यात १४९ मजूर पदांसाठी प्रक्रिया पार पडत आहे. मात्र या प्रक्रियेत ज्यांना सामावून घेतले गेले नाही अशांनी न्यायालयाचे दार ठोठावले आहेत.
कर्मचारी भरती प्रक्रिया पारदर्शक होणार
दापोली कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे होत असलेली कर्मचारी भरती प्रक्रिया ही पारदर्शकच होणार आहे. या बाबत उमेदवार यांचे कागदपत्रे पडताळणी होणार आहेत. उमेदवार हा खरोखर भूमिहीन आहे की नुसता दाखला जोडला आहे या सगळ्याची पडताळणी समितीकडून होणार आहे आणि ही पडताळणी झाल्यानंतर पात्र उमेदवारांची निवड होणार आहे, असे कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी माहिती देताना सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:11 PM 13/Sep/2025














