Chiplun : खेर्डीतील नवीन पाणी योजना मार्गी लागेल – जयंद्रथ खताते

चिपळूण : खेर्डी येथील नवीन पाणीपुरवठा योजना मार्गी लागलेली नाही. साठवण टाकीकडे जाणाऱ्या रस्त्यावरून वाद निर्माण झाल्याने या योजनेचे काम थंडावले. नवनिर्वाचित तंटामुक्ती अध्यक्षांना पोलिस खात्यातील दांडगा अनुभव आहे. त्यामुळे पाणी योजनेतील गैरसमज दूर करून ती मार्गी लागण्यासाठी प्रयत्न करतील, असा आशावाद राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस जयंद्रथ खताते यांनी ग्रामसभेत व्यक्त केला.

खेर्डी ग्रामपंचायतीची शुक्रवारी ग्रामसभा झाली. खताते म्हणाले, खेर्डी गावासाठी कोट्यवधीची पाणी योजना मंजूर आहे. गावातील बहुतांशी भागात अंतर्गत नवीन पाइपलाइन टाकण्यात आली. साठवण टाकी उभारण्यासाठी ग्रामपंचायतीने जागाही घेतल्या आहेत; मात्र साठवण टाकीकडे जाणाऱ्या जागेवरून तक्रारी झाल्याने या योजनेला ब्रेक लागला. परिणामी, पाणी योजनेचे काम थंडावले आहे. नवनिर्वाचित तंटामुक्ती अध्यक्षांनी पोलिस विभागात चांगले काम केले आहे. त्यामुळे तंटामुक्ती अध्यक्ष आगामी काळात रखडलेल्या पाणी योजनेला गती देण्याची भूमिका घेतील. साठवण टाकीकडे जाणाऱ्या रस्त्यावरून ग्रामस्थांच्या ज्या काही तक्रारी आहेत त्यावर तंटामुक्ती अध्यक्ष योग्य भूमिका घेतील, अशी अपेक्षा व्यक्त केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:32 AM 15/Sep/2025