Ladki Bahin Yojana : नावावर गाडी दाखवल्याने गरजू महिला लाडकी बहीण योजनेतून बाद

चिपळूण : शासनाच्या ‘लाडकी बहीण’ या महत्त्वाकांक्षी योजनेतून चिपळूणातील एका गरजू महिलेचा अर्ज प्रशासनाने बाद केल्याने संताप व्यक्त होत आहे. कौंढरताम्हाने येथील संगीता तावडे या मोलमजुरी करून जगणाऱ्या महिलेचा अर्ज घरात गाडी असल्याने पात्र नाही या कारणावरून बाद करण्यात आला आहे. तावडे यांनी ही माहिती दिली.

संगीता तावडे यांच्या पतीचे निधन बारा वर्षांपूर्वी झाले. त्यानंतर तीन वर्षांच्या मुलीला घेऊन त्या कच्च्या घरात वास्तव्यास आहेत. दैनंदिन मोलमजुरी करून संसाराचा गाडा ओढणाऱ्या संगीता यांचे उत्पन्न अत्यल्प आहे. एकवेळ पोट भरायलाही संघर्ष करावा लागतो. अशा परिस्थितीत त्यांच्या नावावर गाडी असल्याचे दाखवून अर्ज बाद करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

आमची, आमच्या घराची अवस्था बघा. आम्ही जगण्यासाठी धडपडत आहोत, पोट भरण्यासाठीही कसरत करावी लागते. गाडी कुठून आणू? आमच्या नावावर गाडी कोणी दाखवली, हेच आम्हाला माहीत नाही, असे संगीता तावडे म्हणाल्या.

लाडकी बहीण योजनेचा उद्देश गरजू महिलांना आर्थिक आधार देणे हा आहे. परंतु ज्यांना खरोखर मदतीची गरज आहे, त्यांचा अर्ज फेटाळला जाणे ही शासन यंत्रणेची चेष्टा असल्याचे ग्रामस्थांमध्ये बोलले जात आहे. या प्रकरणाची चौकशी करून, ज्यांच्याकडे प्रत्यक्षात वाहन नाही अशा महिलांना न्याय मिळावा, अशी मागणी ग्रामस्थांसह विविध समाजघटकांतून होत आहे.

संबंधित महिलेच्या कागदपत्रांची पुन्हा तपासणी केली जाईल. तिच्याकडे गाडी आहे किंवा नाही याबाबतचा अहवाल आम्ही दिलेला नाही. कदाचित प्रादेशिक परिवहन विभागाकडून त्यासंदर्भातील माहिती दिली गेली असावी. ६५ पेक्षा जास्त वय पूर्ण झालेल्या लाभार्थीची आम्ही यादी पाठवली होती त्यामध्ये या महिलेचा नाव नाही- सुनीता नाईकवडी, प्रकल्प प्रमुख, एकात्मिक बाल विकास सेवा, चिपळूण

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:03 PM 19/Sep/2025