राजापूर : सेवा पंधरवडांतर्गत राजापूर तालुक्यात विविध उपक्रम राबविण्यात आले होते. त्यात वाडीवस्ती आणि शेतशिवार जोडणाऱ्या सुमारे ५३८ पाणंद रस्त्यांचे सव्र्व्हेक्षण करण्यात आले. त्या रस्त्यांची गावनमुना नं. २३ वर नोंद करण्याची प्रशासकीय प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती महसूल प्रशासनाकडून देण्यात आली. या सर्वेक्षणातून नोंद नसलेले रस्ते आता नकाशावर येणार आहेत.
तहसीलदार विकास गंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यामध्ये राबविण्यात आलेल्या सेवा पंधरवड्यातील विविध उपक्रमांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करण्यात आली. त्यात ग्रामीण रस्ते, हद्दीचे रस्ते, ग्रामीण गाडी मार्ग, पायमार्ग, शेतावर जाण्याचे पायमार्ग व गाडीमार्ग, शेत पाणंद रस्त्याचे अभिलेख अद्ययावत करणे, त्यावर असलेले अतिक्रमण हटवणे, रस्त्यांना विशिष्ट क्रमांक देण्याची कार्यपद्धती निश्चित करणे आदींचा समावेश होता. याशिवाय सर्वसामान्यांना शासनाच्या विविध सोयी-सुविधांसह योजनांचा लाभ देणारे उपक्रम राबविण्यावरही या सेवा पंधरवड्यातील उपक्रमांमध्ये भर देण्यात आला होता.
त्यात सेवा पंधरवड्यात महसूल प्रशासनाने विविध रस्त्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. तालुक्यातील वाडीवस्ती आणि शेतशिवार जोडणाऱ्या ५३८ रस्त्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षण केलेल्या रस्त्यांची गावनमुना नं. २३ वर नोंद करण्याची प्रशासकीय प्रक्रिया सुरू असल्याचेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे आता लोकांच्या वापरात असलेले; परंतु नोंद नसलेले अनेक रस्ते नकाशावर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याचवेळी लोकांसह शेतकऱ्यांचाही प्रवास अधिक सुलभ आणि सोयीचा झाला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:59 AM 16/Oct/2025














