Rajapur : राजापूर शहरातील प्रमुख रस्त्यांवर खड्डे

राजापूर : शहरातील प्रमुख रस्त्यांवर खड्डे असल्यामुळे रस्त्याने प्रवास करताना प्रवाशांना कसरत करावी लागते. खड्ड्यांमुळे वाहन नादुरुस्तीचे प्रमाणही वाढले असून, खड्यांच्या समस्येमध्ये धुळीच्या त्रासाची भर पडली आहे. त्यामुळे वाहनचालकासह पादचारी आणि रस्त्यावरील व्यावसायिक पुरते त्रस्त झाले आहेत.

पावसाळ्यात राजापूरवासीयांना खड्डेमय रस्त्याच्या समस्येला सामोरे जावे लागले आहे. त्यात अंतर्गत रस्त्यासह प्रमुख रस्त्यांची खड्ड्यांमुळे पुरती चाळण झाली आहे. खड्डेमय रस्त्यावरून वाहने चालवावी लागत असल्यामुळे वाहने नादुरूस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. वाहनचालकांसोबत प्रवाशांनाही या खड्डेमय रस्त्यातून प्रवास करताना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या त्रासाबद्दल रिक्षा व्यावसायिकांनी नगरपालिका प्रशासनाना निवेदन दिले होते.

गणेशोत्सवात जवाहरचौक ते जकातनाका या मुख्य रस्त्यावर पेव्हरब्लॉक बसवण्यात आले होते. त्यामुळे या भागातील खड्यांचा प्रश्न दूर झाला; मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन परिसरातील खड्डे जैसे थे आहेत. राजापूर हायस्कूलसमोरील भागात रस्त्यामध्ये खड्डे पडले असून, उतारावरील खडी वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे. वरच्या पेठ परिसरातील जांभ्या दगडाने भरलेले मुख्य रस्त्यातील खड्डेही आता वाढले आहेत. शहरातील मुख्य रस्त्यांना लागलेले खड्ड्यांचे ग्रहण सुटेनासे झालेले आहे. खड्यांबरोबरच आता धुळीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. यावर तत्काळ उपाययोजना व्हाव्यात, अशी अपेक्षा वाहनचालकांसह व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:25 PM 16/Oct/2025