हसरे चेहरे, मनात उमेदवारीचे आखाडे! रत्नागिरीच्या ‘नगरलक्ष्मी’ पदासाठी तिघींमध्ये रस्सीखेच

रत्नागिरी, १६ ऑक्टोबर: रत्नागिरीच्या राजकीय वर्तुळात सध्या नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. महिलांसाठी राखीव असलेल्या या पदासाठी सत्ताधारी शिवसेना शिंदे गटातून जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. मात्र, आज एका सार्वजनिक कार्यक्रमात या स्पर्धेतील प्रमुख दावेदारांमधील मैत्रीचे आणि दिलखुलास गप्पांचे एक अनपेक्षित दृश्य पाहायला मिळाले, ज्यामुळे राजकीय चर्चांना आणखी उधाण आले आहे.

निमित्त होते रत्नागिरी नगरपालिकेच्या तारांगण परिसरात कोकणातील भारतरत्न विजेत्यांच्या प्रतिकृतींच्या लोकार्पण सोहळ्याचे. या कार्यक्रमाला राज्याचे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. याच गर्दीत, नगराध्यक्ष पदाच्या प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या तीन माजी नगरसेविका – स्मितल पावसकर, शिल्पा सुर्वे आणि वैभवी खेडेकर – एकमेकींशी दिलखुलासपणे गप्पा मारताना दिसल्या. उमेदवारीसाठी जरी तिघींमध्ये तीव्र स्पर्धा असली, तरी सार्वजनिक ठिकाणी त्यांनी दाखवलेली ही जवळीक अनेकांसाठी कुतूहलाचा विषय ठरली.

महिला राज निश्चित, पण ‘ती’ एक कोण?

रत्नागिरी पालिकेचे नगराध्यक्षपद यंदा खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित झाल्याने पालिकेवर ‘महिला राज’ येणार हे निश्चित झाले आहे. शिंदे गटाकडून या पदासाठी तीन प्रमुख नावांची चर्चा आहे आणि तिघींचीही स्वतःची अशी राजकीय ताकद आहे.

अनुभवाची शिदोरी: स्मितल पावसकर

या शर्यतीत अनुभवाच्या जोरावर स्मितल पावसकर यांचे नाव आघाडीवर आहे. प्रभाग २ मधून सलग ६ वेळा नगरसेविका म्हणून निवडून येण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. तब्बल ३० वर्षांच्या नगरसेविकेच्या कारकिर्दीत त्यांनी आपल्या प्रभागावर मजबूत पकड निर्माण केली आहे. कार्यकर्त्यांची फौज जमा करण्यापेक्षा थेट मतदारांशी, विशेषतः महिला वर्गाशी असलेला त्यांचा थेट संपर्क ही त्यांची सर्वात मोठी जमेची बाजू मानली जाते. प्रभागातील प्रत्येक गल्ली आणि घरातील मतदारांची अचूक माहिती त्यांना तोंडपाठ आहे. हा प्रदीर्घ अनुभव आणि दांडगा जनसंपर्क त्यांना उमेदवारीच्या जवळ नेणारा ठरू शकतो.

संयमी आणि सुशिक्षित चेहरा: शिल्पा सुर्वे

दुसऱ्या इच्छुक उमेदवार आहेत शिल्पा सुर्वे. साळवी स्टॉप परिसरातील (प्रभाग ५) सुशिक्षित आणि नोकरदार वर्गात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. शांत आणि संयमी स्वभावामुळे त्यांची प्रतिमा समाजात अत्यंत सकारात्मक आहे. मागील निवडणुकीत पक्षांतर्गत विरोधाचा सामना करूनही त्यांनी विजय मिळवून आपली ताकद सिद्ध केली होती. दोन टर्म नगरसेविका म्हणून काम पाहिल्यानंतर सध्या त्या शिवसेना महिला जिल्हाप्रमुख म्हणून पक्षाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळत आहेत. राजकीय जाणकारांच्या मते, भविष्यात महायुतीची गणिते जुळल्यास आणि हे पद शिवसेनेच्या वाट्याला आल्यास, भाजपमधूनही शिल्पा सुर्वे यांच्या नावाला प्राधान्य दिले जाण्याची दाट शक्यता आहे.

तरुण आणि आश्वासक नेतृत्व: वैभवी खेडेकर

या स्पर्धेतील तिसरे नाव म्हणजे वैभवी खेडेकर. त्यांना नगरसेविका म्हणून एक वर्षाचा अनुभव असला तरी, त्यांचे पती विजय खेडेकर यांचा प्रभागातील दांडगा जनसंपर्क आणि राजकीय वजन त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. तरुण चेहरा आणि खेडेकर कुटुंबाचा प्रभाव या जोरावर त्याही नगराध्यक्ष पदासाठी एक प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत.

अंतिम निर्णय ‘सामंत’ दरबारी!

एकाच पक्षातील या तीनही महिला नेत्या आपापल्या परीने उमेदवारीसाठी प्रयत्नशील असल्या तरी, रत्नागिरीच्या राजकारणातील अंतिम शब्द हा जिल्ह्याचे नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचाच असणार आहे. अनुभव, पक्षनिष्ठा, जनसंपर्क, आणि भविष्यातील राजकीय समीकरणे या सर्व बाबींचा विचार करूनच उदय सामंत आपला निर्णय देतील. त्यामुळे आज जरी या तिन्ही दावेदार हसत-खेळत गप्पा मारताना दिसल्या असल्या, तरी नगराध्यक्ष पदाचा मुकुट कोणाच्या शिरपेचात बसणार, यासाठी सर्वांच्या नजरा उदय सामंत यांच्या निर्णयाकडे लागल्या आहेत.