राजापूर : कोणतीही श्रीमंती, कसलाही वारसा नसताना सामान्य कुटुंबातील मुलगा केवळ ग्रंथाच्या सहवासामुळे राष्ट्रपती पदापर्यंत पोहचू शकतो हे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनचरित्रातून शिकायला मिळते. ग्रंथांमुळेच जीवनाला आकार प्राप्त होतो, असे प्रतिपादन मुंबईचे ज्येष्ठ ग्रंथतपस्वी श्याम जोशी यांनी येथे केले.
येथील नगर वाचनालयाच्या वतीने बुधवारी नगर वाचनालय सभागृहात आयोजित वाचन प्रेरणा दिन आणि उत्तम वाचक पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. ते म्हणाले की, वाचनाने मनाला आनंद मिळतो, वेळ जातो एवढेच नाही तर वाचनातून सकारात्मक जीवन जगण्याची प्रेरणा मिळते. वाचनामुळेच जीवनाला आशय प्राप्त होतो. जो आनंद पुस्तकातून मिळतो तो आनंद मोबाईलमध्ये मिळत नाही. म्हणून मोबाईल वाईट नाही. काळानुरूप आपल्याला डिजीटल माध्यमांशी जुळवून घ्यावे लागेल.
यावेळी बी. के. गोंडाळ व मानसी हजेरी यांच्या सहयोगातून दिला जाणारा कै. सावित्री केरू गोंडाळ स्मृती उत्तम वाचक पुरस्कार माजी नगराध्यक्ष रमाकांत मालपेकर व निशिगंधा चव्हाण यांना प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी वाचनालय अध्यक्ष प्रभात पाध्ये, कार्यवाह जयंत अभ्यंकर, राजन रानडे, संचालिका श्रृती ताम्हनकर, मालती गोंडाळ, गो. रा. कुलकर्णी, जगदीश पवार, शैलेश आंबेकर, सौ. आंबेकर, दर्शना मांडवकर, श्री. कदम, सहा. ग्रंथपाल लोचनी साळवी, अनिकेत नाडणकर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक कार्यवाह जयंत अभ्यंकर, सूत्रसंचालन ग्रंथपाल पद्मजा कारेकर, तर आभार प्रदर्शन लिपीक साईशा पडयार यांनी केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:13 PM 17/Oct/2025














