एनएसएसमधून सशक्त, संस्कारित नागरिक घडतात : सुनील गोसावी

पावस : शिबिरातून चांगले नागरिक घडवण्याची यशस्वी परंपरा एनएसएसमध्ये आहे. आनंददायी शिबिरातून भविष्यासाठी चांगले सोबती मिळतात व एनएसएस कुटुंब तयार होते. एनएसएसमधून सशक्त, संस्कारित नागरिक घडतात, असे प्रतिपादन अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य सुनील गोसावी यांनी केले. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

एनएसएसचे विशेष निवासी शिबिर कुर्धे गावातील राधा पुरुषोत्तम पटवर्धन माध्यमिक विद्यामंदिरात सुरू झाले. याप्रसंगी पर्यवेक्षक विद्याधर केळकर, ग्रुपग्रामपंचायत मेर्वीच्या ग्रामसेविका अमृता गोरिवले, शिक्षण सुधारक समितीचे कार्याध्यक्ष वसंत फडके, राधा पुरुषोत्तम पटवर्धन हायस्कूलचे मुख्याध्यापक विजयानंद निवेंडकर, माजी सरपंच शशिकांत म्हादये, पोलिस पाटील जयंत फडके, प्रा. सचिन सनगरे, विनायक गावडे, माजी कार्यक्रमाधिकारी मकरंद दामले, निनाद तेंडुलकर, कार्यक्रमाधिकारी प्रा. अभिजित भिडे, सहकार्यक्रमाधिकारी प्रा. रिद्धी हजारे, प्रा. सुनील भोईर, प्रा. भूषण केळकर उपस्थित होते.

प्रा. भिडे यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला व स्वागत केले. प्रास्ताविकात त्यांनी शिबिरातील सत्रांचा आढावा घेतला. निवासी शिबिरांतर्गत श्रमसंस्कारातून वनराई बंधारा, भातकापणीचा अनुभव, गणेशगुळे समुद्र परिसर व शाळा परिसर स्वच्छता करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक व मानसिक विकास साधण्याच्या दृष्टिकोनातून विविध कार्यशाळा, व्याख्याने, खेळ चर्चासत्रे, स्पर्धा इत्यादींचे आयोजन केले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रिद्धी हजारे यांनी केले. आभार प्रा. सुनील भोईर यांनी मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:04 PM 28/Oct/2025