रत्नागिरी पालिका निवडणूक : ‘विकासा’पेक्षा ‘व्यक्तिगत ताकदी’चीच चुरस; महायुतीला युतीचा फायदा, मविआमध्ये नगराध्यक्षपदावरून नाराजीनाट्य!

रत्नागिरी, ता. ७ : गेली तीन वर्षे प्रशासकीय राजवटीत असलेल्या रत्नागिरी नगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजत असताना, यंदाची लढत ही ‘विकासा’च्या मुद्द्यापेक्षा ‘स्पर्धात्मक’ आणि ‘व्यक्तिगत ताकदी’वरच अधिक रंगणार असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. शहराचा विकास ‘स्मार्टसिटी’पर्यंत आल्याचा दावा होत असला तरी, खरा कस हा महायुतीचे जागावाटप आणि महाविकास आघाडीतील नगराध्यक्षपदाचा उमेदवार यावरच लागणार आहे.

रत्नागिरी पालिकेवर वर्षानुवर्षे शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे. दिवंगत माजी नगराध्यक्ष उमेश शेट्ये यांनी ‘वन टू का फोर’ करत ही सत्ता काबीज करण्याचा इतिहास वगळता, पालिकेवर कायमच शिवसेना आणि नंतर महायुतीचा वरचष्मा राहिला आहे. मात्र, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांमध्ये पडलेली फूट आणि विचित्र राजकीय परिस्थितीने यंदाची समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत.

महायुती ‘सूक्ष्म नियोजना’त, सामंतांची दुहेरी रणनीती
राज्य आणि केंद्रातील सत्तेच्या जोरावर भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हे महायुती म्हणूनच स्थानिक स्वराज्य संस्था लढवण्याच्या तयारीत आहेत. पालकमंत्री उदय सामंत यांनी सत्तेचा पुरेपूर फायदा घेत शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे आणली आहेत.

मात्र, एवढा विकास करूनही विधानसभा निवडणुकीत शहरातून अपेक्षित मतदान न झाल्याने, ही निवडणूक केवळ विकासाच्या मुद्द्यावर होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे उदय सामंत यांनी बदललेल्या राजकारणाची नाडी ओळखून, व्यक्तिगत जनसंपर्क, लोकांची तत्परतेने केलेली कामे आणि त्याला विकासाची जोड यावर भर दिला आहे. त्यांनी शहरातील पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांना निधी देत आपापले प्रभाग मजबूत केले आहेत.

मुस्लिम समाजातील गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न
लोकसभा आणि विधानसभेला जो ‘फेक नरेटिव्ह’ होता, तो बदलून मुस्लिम समाजाचा कल पुन्हा शिवसेनेकडे वळवण्यासाठी उदय सामंत यांचे विशेष प्रयत्न सुरू आहेत. कोट्यवधींची विकासकामे आणि हा बदललेला सामाजिक दृष्टिकोन, याचा फायदा मिळेल अशी महायुतीला अपेक्षा आहे. भाजप आणि शिवसेना सूक्ष्म नियोजन करूनच रिंगणात उतरणार असल्याने, महायुती झाल्यास ही निवडणूक त्यांना फलदायी ठरू शकते.

महाविकास आघाडीत नगराध्यक्षपदाचा ‘तिढा’
दुसरीकडे, महाविकास आघाडीचा (मविआ) विचार करता, रत्नागिरीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांची काही प्रमाणात ताकद आहे, मात्र काँग्रेस आपली ताकद निर्माण करण्यात कमी पडत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटल्यामुळे शहरातील मूळ ताकद विभागली गेली आहे. त्यातच गेल्या तीन वर्षांपासून सत्तेत नसल्याने महाविकास आघाडीचा जनतेशी कितपत संपर्क आहे, हा देखील प्रश्नच आहे. गेल्या काही महिन्यांपासून शिवसेनेचे उपनेते बाळ माने हे ठाकरे गटाची मरगळ झटकण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. मात्र, ‘मविआ’मधील नगराध्यक्षपदाचा तिढाच नाराजीचे मुख्य कारण ठरण्याची चिन्हे आहेत. बाळ माने हे आपली सून शिवानी माने यांना नगराध्यक्षपदाच्या लढतीत उतरवण्यासाठी आग्रही आहेत. या थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवरूनच महाविकास आघाडीमध्ये मोठे ‘नाराजीनाट्य’ रंगण्याची दाट शक्यता असून, याचा थेट फटका आघाडीला बसू शकतो.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:29 08-11-2025