Ratnagiri: गणपतीपुळेत संकष्टी चतुर्थीला लाखोंची उलाढाल

रत्नागिरी : सलग दोन दिवस आलेल्या सुट्यांमुळे शनिवारी (ता. ८) संकष्टी चतुर्थीला प्रसिद्ध गणपतीपुळे येथील श्रींच्या मंदिरामध्ये आणि आंजर्ले (ता. दापोली) येथील कड्यावरील गणपती मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी होती. गणपतीपुळेत दिवसभरात सुमारे ३० हजारांहून अधिक भक्तांनी दर्शन घेतल्यांची नोंद झाली आहे. त्यामुळे दिवाळीनंतर किनाऱ्यावरील पर्यटन व्यावसायिकांना दिलासा मिळाला.

गणपतीपुळे हे प्रसिद्ध धार्मिक पर्यटनस्थळ आहे. त्यामुळे अंगारकी, संकष्टी चतुर्थीला दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी होते. दुसरा शनिवार आणि रविवारी या दोन शासकीय सुट्या जोडून असल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रासह अन्य भागातील भाविक गणपतीपुळेत दाखल झाले होते. पहाटेला मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. त्यानंतर दुपारी ४ वा. प्रदक्षिणेसाठी श्रींची पालखी बाहेर पडली.

मंदिरात श्रींचे दर्शन घेतल्यानंतर फिरण्यासाठी भाविक किनाऱ्यावर येत होते. अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांचाही कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोंथा चक्रीवादळामुळे ऐन दिवाळीत पर्यटक आले तरीही जलक्रीडा व्यावसायिकांना फटका बसलेला होता. त्यांचे मोठे नुकसान झाले होते; मात्र संकष्टी चतुर्थीला गणपतीपुळेत आलेल्या पर्यटकांमुळे व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. दिवसभरात सुमारे १० लाखांची उलाढाल झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, गणपतीपुळे बरोबरच दापोली तालुक्यात आंजर्ले येथील कड्यावरील गणपती मंदिरात भाविकांनी श्रींच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. गणपती मंदिराबरोबरच अथांग समुद्रकिनारा असल्याने पर्यटकांचा ओढा यंदा तिकडेही वाढलेला आहे

दरम्यान, गणपतीपुळे बरोबरच दापोली तालुक्यात आंजर्ले येथील कड्यावरील गणपती मंदिरात आज भाविकांनी श्रींच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. गणपती मंदिराबरोबरच अथांग समुद्रकिनारा असल्याने पर्यटकांचा ओढा यंदा तिकडेही वाढलेला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:48 PM 10/Nov/2025