दापोली : विकासाची भाषा करणारे आज सर्वत्र दिसतात, पण ज्या मतदारसंघात मंत्र्यांचे नेतृत्व आहे, त्या भागातील रस्ते आणि सुविधांची अवस्था आजही बिकट आहे. पैशाने निवडणुका जिंकल्या जातात; पण लोकांची मने मात्र विचारानेच जिंकली जातात, अशा शब्दांत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते व आमदार भास्कर जाधव यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर निशाणा साधला.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दापोली शहरातील पेन्शनर हॉलमध्ये घेण्यात आलेल्या गण-गटनिहाय आढावा बैठकीतनंतर पत्रकारांना माहिती देताना ते बोलत होते.
राज्यात पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांचे वातावरण तापू लागले असून रत्नागिरी जिल्ह्यात सर्वच पक्षांनी संघटनांची धुरा आवळायला सुरुवात केली आहे. याचनिमित्ताने दापोलीत आयोजित या बैठकीत निवडणूक तयारी, उमेदवारांची निवड, जनसंपर्क मोहीम आणि आघाडीतील समन्वयासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. यावेळी जाधव यांनी ‘छम्छम् बार’, असा उल्लेख करून रामदास कदम यांच्यावर व्यंगात्मक टोलेबाजी केली.
आगामी निवडणूक आघाडीवर बोलताना जाधव म्हणाले, आघाडी निश्चित होईल. मात्र सत्ताधारी युतीमध्ये ताळमेळच नाही. त्यामुळे या तफावतीचा फायदा आघाडीला होणार, असा विश्वास व्यक्त केला. या बैठकीस जिल्हा संपर्क प्रमुख सहदेव बेटकर, उत्तर रत्नागिरी जिल्हा प्रमुख विक्रांत जाधव, तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर, जिल्हा सरचिटणीस अनिल जाधव, माजी नगराध्यक्षा ममता मोरे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:50 AM 13/Nov/2025














