रत्नागिरी : जिल्ह्यात चोरी व घरफोडीच्या वाढत्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांनी दिलेल्या सूचनांनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई केली आहे. संगमेश्वर येथील ‘दत्त कृपा मोबाईल शॉपी’ दुकानातील चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीस शहापूर (जि. ठाणे) येथून अटक करण्यात आली असून, त्याने राजापूर येथून दुचाकी चोरी केल्याचीही कबुली दिली आहे.
दिनांक ८ ऑक्टोबर ते ९ ऑक्टोबर दरम्यान संगमेश्वर एस.टी. स्टँड जवळील राजेश तुकाराम आंबवकर यांच्या ‘दत्त कृपा मोबाइल शॉपी’ दुकानाचे कुलूप तोडून व शटर उचकटून अज्ञात चोरट्याने ३ मोबाईल, १ राऊटर, १ पॉवर बँक, १ हेडफोन आणि १ स्मार्ट वॉच असा एकूण ५१,४९९ किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाणे येथे गुन्हा (रजि. नं. ११७/२०२५, भा.न्या.सं. कलम ३०५(अ), ३३१(४)) दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे व अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांनी तातडीने तपास पथक तयार केले. सी.सी.टी.व्ही फुटेज व तांत्रिक माहितीच्या आधारे सदरचा गुन्हा शंकर पाटील उर्फ शंकर साळुंखे (रा. कर्जत, जि. रायगड) याने केल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली.
त्यानुसार पथकाने शहापूर व मुरबाड (जि. ठाणे) येथे जाऊन आरोपी शंकर अर्जुन साळुंखे उर्फ शंकर अर्जुन पाटील (वय २३, रा. कर्जत, जि. रायगड) यास दिनांक ११ नोव्हेंबर रोजी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याच्याकडून चोरीस गेलेला १८,९९९ किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपी शंकर अर्जुन साळुंखे याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्याने सुमारे १ महिन्यापूर्वी राजापूर येथून स्प्लेंडर मोटार सायकल चोरी केल्याचीही कबुली दिली आहे. याप्रकरणी राजापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा (रजि. नं. १९०/२०२५, भा.न्या.सं. कलम ३०३(२)) दाखल आहे.
आरोपी शंकर अर्जुन साळुंखे उर्फ शंकर अर्जुन पाटील याच्यावर रायगड व ठाणे या दोन जिल्ह्यांमध्ये यापूर्वी चोरी व घरफोडीचे एकूण ३ गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपीस मा. न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यास ४ दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास संगमेश्वर पोलीस ठाणे करत आहे.
पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखालील या पथकात पो. हे. काँ./९०९ विजय आंबेकर, पो. हे. काँ./२६२ विवेक रसाळ, पो. हे. काँ./१४०७ दिपराज पाटील आणि चा. पो. कॉ./२१५ अतुल कांबळे यांचा समावेश होता.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:18 15-11-2025














