Dapoli- Harne Road | दापोली- हर्णे मार्गाची अक्षरशः चाळण

दापोली : दापोली- हर्णे या मार्गाची अक्षरशः चाळण झाली असून, प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. दिवाळी पर्यटन हंगामात या मार्गावर मोठ्या प्रमाणात पर्यटकांची रेलचेल असते. रस्त्याची दयनीय अवस्था पाहून नागरिकांसह प्रवाशांमधून उघडउघड नाराजी व्यक्त होत आहे. पावसाळा संपूनही दुरुस्तीच्या कोणत्याही ठोस हालचाली सुरू न झाल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

दापोली तालुका पर्यटनासाठी प्रसिद्ध असला तरी मुरूड, कर्दे, हर्णे, पाळंदे, आंजर्ले, केळशी या सर्व प्रमुख किनारी भागांतील रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांची कसरत सुरू झाली आहे. विशेषतः सालदुरे, आसुद आणि हर्णै मार्गावरील खोल खड्डे वाहनचालकांसाठी जीवघेणे ठरत आहेत. बुरोंडीनाका भागातील खड्डे वाचवताना दुचाकी व चारचाकी वाहनांची तारांबळ उडते. अनेक दुचाकीस्वारांचे वाहनांवरील नियंत्रण गेल्यामुळे अपघातांना सामोरे जावे लागत आहे. वाहनांचे नुकसान, टायरची झीज आणि अनावश्यक खर्चामुळे लोक त्रस्त झाले असून, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींबाबत नाराजी व्यक्त करत आहेत. अलीकडे केलेल्या डागडुजीतील खड्डे काही दिवसांतच पुन्हा उघडे पडल्यामुळे कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दरवर्षी पावसाळ्यानंतर सतत खड्यांविषयी तक्रारीचा पाढा नागरिकांना वाचावा लागत आहे. रस्त्यांची स्थिती कायमच गंभीर असल्यामुळे गोंधळात भर पडत आहे. पर्यटनस्थळांपर्यंत पोहोचण्यासाठी पर्यटकांना त्रास सहन करावा लागतो. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधला असता, नोव्हेंबर अखेरपर्यंत खड्डे भरण्याच्या कामास सुरुवात होईल, असे सांगण्यात आले; मात्र नोव्हेंबर महिन्याचा पंधरवडा उलटूनही प्रत्यक्षात कोणताही बदल दिसत नसल्याने नागरिकांचा संयम सुटत चालला आहे. दापोली हर्णे हा केवळ पर्यटनमार्ग नसून, स्थानिक व्यवसाय, मच्छीमार बंदर आणि दैनंदिन वाहतुकीसाठीही अत्यंत महत्त्वाचा असल्याने तातडीने गुणवत्तापूर्ण दुरुस्तीचे काम सुरू करावे, अशी सर्वसाधारण मागणी होत आहे.

बांधकाम विभागाला पत्र
दापोली – हर्णे मुख्य रस्त्याची प्रचंड खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली असल्याचे स्थानिक नागरिकांनी राज्यमंत्री योगेश कदम यांच्या निदर्शनास आणून दिले असता काल (ता. १३) सार्वजनिक बांधकाम खात्याला दापोली – हर्णे मुख्य रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करून द्यावी, असे पत्र दिले आहे.

दररोज या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे जीव मुठीत धरून करावा लागतो. खड्क्यामुळे दुचाकी घसरते, चारचाकी वाहने खड्क्यात आपटतात, पाठदुखी होते तरीही प्रशासनाला काहीच फरक पडत नाही- युवराज भुवड, नागरिक

पर्यटक येतात; पण रस्त्यांची अवस्था पाहून ते परत जाताना नाराजी व्यक्त करतात. याचा थेट परिणाम आमच्या पर्यटन व्यवसायावर होत आहे- दिग्विजय जाधव, व्यावसायिक, हर्णे

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:54 AM 15/Nov/2025