दापोली : हर्णे बंदर हे दापोली तालुक्याचे महत्त्वाचे मत्स्यबंदर असून, या भागातील शेकडो कुटुंबांचा व्यवसाय या बंदरावर अवलंबून आहे. त्यामुळे जेटीचे बांधकाम करताना मच्छीमारांच्या सुरक्षिततेला, सोयीसुविधांना आणि भविष्यातील वापर क्षमतेला प्राधान्य देणे आवश्यक आहे. कोणत्याही कारणाने काम विलंब होता कामा नये, असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री आणि दापोलीचे आमदार योगेश कदम यांनी केले.
हर्णे बंदर येथे बांधण्यात येत असलेल्या नव्या जेटीच्या कामाची त्यांनी आज प्रत्यक्ष पाहणी करून चालू असलेल्या कामाचा सविस्तर आढावा घेतला. या वेळी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी हे काम जलदगतीने, सुरक्षित आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करणे ही संबंधित विभागांची जबाबदारी आहे, असे सांगून कामाची गती वाढवण्याचे तसेच नियोजनबद्ध पद्धतीने गुणवत्तापूर्ण काम करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
या वेळी स्थानिक नौकामालक आणि ग्रामस्थांनी या वेळी जेटी परिसरातील काही अडचणी व समस्या मांडल्या. आमच्या नौका कातळ दगडांना धडकू नयेत, तसेच भरती-ओहोटीच्या वेळी सुरक्षितरीत्या किनाऱ्याला लागण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणीही उपस्थितांनी केली.
या वेळी स्थानिकांचा आवाज हा शासनापर्यंत पोहोचवणे ही माझी जबाबदारी आहे. त्यामुळे जेटीच्या कामामध्ये आवश्यक त्या तांत्रिक सुधारणा करून स्थानिकांच्या मागण्यांचा विचार केला जाईल, अशी ग्वाही कदम यांनी दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:05 PM 15/Nov/2025














