गुहागर : अवकाळी पावसाने गुहागर तालुक्यातील एकूण ६२४ शेतकऱ्यांचे भात व नाचणी शेतीचे मोठे नुकसान झाले. प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. या अहवालानुसार १७१ हेक्टर शेती बाधित झाली आहे. ७१ गावांमधील शेतीला अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. ११ लाख ६३ हजार इतके नुकसान झाले असून तसा अहवाल शासनाकडे पाठवला असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी अमोल क्षीरसागर यांनी दिली.
गुहागर तालुक्यात स्थानिक शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, यावर्षी शेती उत्पादन ७० ते ७५ टक्के घटण्याची शक्यता आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आजपर्यंत तालुक्यातील ७१ गावांमधील एकूण ६२४ शेतकऱ्यांच्या शेती नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. यामध्ये पाटपन्हाळे, साखरी बु., कोंडकारूळ, पालशेत, मारुती मंदिर, बारभाई, निवोशी, वरवेली, मळण, पालपेणे, देवघर, गिमवी, आरे, झोंबडी, चिखली, काजूर्ली, खोडदे, कोतळूक, तवसाळ, हेदवी, वाघांबे, पिंपर, कुटगिरी, वेळणेश्वर, असगोली, किर्तनवाडी, वरचापाट, शीर, सुरळ, मोहितेवाडी, गुहागर, अडूर, भातगाव तिसंग, जामसूद, कौंढर काळसूर, कोंडवाडी, कुडली, मुसलोंडी, मासू, साखरीआगार, पांगरी तर्फे वेळंब, तळवली, निगुंडळ, शीर बु., आदी गावांचा समावेश आहे.
शेतकरी ओळखपत्र त्वरित काढावे
शेतीची नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकरी ओळखपत्र अनिवार्य करण्यात आले आहेत. ज्यांनी हे ओळखपत्र काढलेले नाहीत त्यांनी त्वरित ऑनलाईन पद्धतीने ते काढून घ्यावे. ज्यांनी यापूर्वी अर्ज भरले आहेत व त्यांना अद्यापही ओळखपत्र मिळालेले नाही त्यांनी रजिस्टर नंबर आपल्या जवळ बाळगावा, असे आवाहन कृषी विभागाने केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:23 PM 15/Nov/2025














