दापोली : दापोली-खेड मार्गाचे डांबरीकरण आणि काँक्रिटीकरणाचे काम सध्या सुरू असून या कामासाठी लागणारे पाणी वाकवली गावातील बंधाऱ्यातून राजरोसपणे नेले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ग्रामस्थांना न विचारता आणि कोणतीही परवानगी न घेता गावातील पाणी वापरल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
या प्रकाराची माहिती मिळताच स्थानिक जागरूक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. चौकशीदरम्यान संबंधित ठेकेदाराला विचारणा करण्यात आली असता त्याने आपली चूक मान्य करत पुढे वाकवली गावातील पाणी न वापरण्याचे आश्वासन दिले.
ग्रामस्थांनी सांगितले की, भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेता अशा प्रकारच्या पाणी चोरीवर नियंत्रण ठेवणे अत्यावश्यक आहे. तसेच प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन ठेकेदारांना सक्त ताकीद द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
बांधकाम विभागाकडे चौकशीची मागणी
दापोली-खेड मार्गाचे काम हे शासकीय असून त्यासाठी आवश्यक सर्व खर्चाची तरतूद आहे. तरीसुद्धा ठेकेदारांकडून परवानगी न घेता गावातील पाणी वापरले जाणे हा प्रकार गंभीर आहे. बांधकाम विभागाने याची चौकशी करून आवश्यक कारवाई करावी, अशी मागणी सुरेश जाधव, ग्रामपंचायत सदस्य व माजी सैनिक, वाकवली यांनी केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:55 PM 15/Nov/2025














