Ratnagiri : थिबा राजाकालीन बुद्धविहार बचाव संघर्ष समितीच्या सहा आंदोलकांवर गुन्हे

रत्नागिरी : थिबा राजाकालीन बुद्धविहार बचाव संघर्ष समितीने काढलेल्या मोर्चामध्ये आक्षेपार्ह आणि प्रक्षोभक वक्तव्याप्रकरणी पोलिसांनी आंदोलकांवर कारवाईचा बडगा उगारला. तक्रारीवरून पोलिसांनी संघर्ष समितीच्या सहा जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

संघर्ष समितीने कम्युनिटी सेंटर रद्द करून आरक्षित जागेवरील उठवलेले आरक्षण पूर्ववत करण्याची आणि ती जागा समाजाच्या ताब्यात देण्याची मागणी करत मोर्चा काढला होता. याप्रकरणी प्रमोद प्रकाश पवार यांनी रत्नागिरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. २७ ऑक्टोबरला संघर्ष समितीकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

उपविभागीय कार्यालयाने अटी-शर्तीवर परवानगी दिलेल्या या मोर्चानंतर झालेल्या सभेमध्ये काही पदाधिकाऱ्यांनी बौद्धजन पंचायत समिती या संघटनेचे, तसेच थिबा राजाकालीन बुद्धविहार विकास चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष, कळझोंडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रकाश रामचंद्र पवार यांच्याविषयी गैरशब्द वापल्याचा आरोप केला आहे. तसेच काहींनी आक्षेपार्ह पोस्टही केल्याने समाजात संभ्रम निर्माण झाल्याचे प्रमोद पवार यांनी तक्रारीत म्हटले आहे.

तसेच संघर्ष समितीतील काही पदाधिकाऱ्यांनीही सभेत प्रक्षोभक वक्तव्ये केल्याचे म्हटले आहे. तक्रारीनुसार संघर्ष समितीचे अध्यक्ष एल. व्ही. पवार, कार्याध्यक्ष अनंत सावंत, अनिल जाधव, किशोर पवार, अमोल जाधव आणि राजेश सावंत या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:29 AM 17/Nov/2025