Ratnagiri : ‘ऑक्सिजन’ नाटकाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद

रत्नागिरी : कुटुंबातील माणूस आजारी पडला आणि तो अंथरुणाला खिळून राहिला की घराची काय स्थिती होते या विषयाची उत्कृष्ट अशी मांडणी ‘ऑक्सिजन’ या नाटकातून मांडण्यात आली आहे. ही कथा भावनिक तसेच नाट्यमय घडामोडी घडत असल्याने अगदी शेवटपर्यंत प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवते.

राज्यनाट्य स्पर्धेच्या रत्नागिरी केंद्रावर बुधवारी नेहरू युवा कलादर्शन नाट्यमंदिर पाली निर्मित अनिल काकडे लिखित व रोहित नागले दिग्दर्शित ‘ऑक्सिजन’ हे नाटक झाले. भावनिक तसेच ज्वलंत विषयावर हे नाटक असल्याने कलाकारांनी केलेल्या उत्कृष्ट अभिनयामुळे प्रेक्षकांनीही याला भरभरून प्रतिसाद दिला.

श्री या पात्राभोवती ही कथा गुंतली आहे. श्रीची आई आजारी पडते. तिला परेलिसीसचा झटका येतो आणि ती अंथरुणाला खिळते. दरम्यानच्या काळात श्रीचं लग्नही ठरते. श्री होणाऱ्या बायकोला याचा त्रास होऊ नये म्हणून लग्नही मोडतो. परंतु श्रीची ठरलेली वधू रेणू ही आपण सर्व गोष्टी व्यवस्थितपणे पार पाडू, आईची सेवा योग्य पद्धतीने करेन असे सांगते. यानंतर दोघांचे लग्न होते. सुरूवातीला रेणू सासूची सेवा उत्तम पद्धतीने करते. परंतु हळूहळू तिला कंटाळा येतो तिची श्रीवर चिडचिड सुरू होते. आईच्या आजारपणात श्रीसुद्धा बेजार होतो. औषधोपचारासाठी लागणारे त्याच्याकडील पैसेही संपतात. शेवटी तो रेणूचा एकएक दागिना गहाण ठेवतो. तरीसुद्धाऔषधोपचाराला पैसे पुरत नाहीत. शेवटी श्री सावकाराकडून पैसे घेतो. परंतु कर्जाचे हप्ते न गेल्यामुळे सावकार हा श्रीच्या घरी येतो आणि रेणूशी लगट करण्याचा प्रयत्न करतो. याच दरम्यान त्याच्या घरात राकेश नावाचा अनोळखी माणूस येतो व तो आपण मदत करू पण तुम्ही आईला मारा. या बदल्यात तो ७५ लाख रुपये देऊ असे सांगतो. या बदल्यात मला तुमच्या आईची बॉडी आणि मृत्यूपत्र द्या, असे सांगतो. परंतु याच कालावधीत आईचं निधन होते आणि ही ऑफर रेणूच्या नकळत श्री स्वीकारतो. यानंतर श्री हा रेणूला सांगतो की आईच्या निधनानंतर विम्याचे ५० लाख रुपये आपल्याला भेटले.

यातून तो कर्ज भागवतो, घरदुरुस्ती करण्यासाठी काढतो. या दरम्यान पोलिस निरीक्षक साळिंदेकर हे श्रीच्या घरात येतात उलटसुलट तपासणी करतात. तुमची आई मेली नसून ती जिवंत आहे असे सांगतात. यावेळी रेणूला शॉकच असतो. ती आश्रमात असल्याचे सांगून खात्री करण्यासाठी श्रीला घेऊन जातात. यावेळी श्रीसुद्धा ती आपली आईच आहे असे सांगतो. हे कसं काय शक्य आहे? असे रेणू विचारते. तेव्हा साळिंदेकर हे राकेशला पकडून आणतात आणि या सर्व भांडाफोड होतो. राकेश हा श्रीचा मावस भाऊ असतो. श्रीची आई व राकेशची आई जुळ्या बहिणी असतात. राकेशची बडोद्याला वडिलार्जीत कोट्यवधीची मालमत्ता असते ती आई त्याला विकू देत नाही. शेवटी श्रीला हाताशी धरून राकेश हा प्लॅन करतो. श्रीची आई मेल्यानंतर तिला स्वतःची आई म्हणून तो घरी घेऊन जातो आणि सर्व प्रॉपर्टी घेतो. याचेच ७५ लाख रुपये श्रीला देतो आणि स्वतःच्या आईला आश्रमात टाकतो. या रकमेपैकी श्री हा दवाखान्यात रुग्णांसाठी दान करतो. ही गोष्ट उघड झाल्यानंतर पोलिस निरीक्षकही गहिवरतात. शेवटी हे प्रकरण इथेच संपवतात. राकेशला मात्र चांगलीच तंबी देतात व या बदल्यात राकेशची आई ही श्रीच्या घरात आणतात व तिची सेवा करण्यास सांगतात.

श्रीची भूमिका ही संकेत साळवी, रेणू सायली शिंदे, आई निवेदिता मणचेकर, राकेश – मिथिल दळवी, शिर्के अभिजित सावंत, खोत कुलदीप कुरुप, साळिंदेकर जयू पाखरे यांनी काम केले आहे. तर पार्श्वसंगीत तन्मय डांगे, प्रकाश योजना – यश सुर्वे, रंगभूषा नरेश पांचाळ, वेशभूषा महेश पाखरे, नेपथ्य निर्माण महेश धातवलकर, तर रंगमंच सहाय्यक मनिष लिंगायत, संकेत पालकर, आदित्य पांचाळ, मंदार लिंगायत यांनी काम पाहिलं.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
2:36 PM 21-Nov-2025