Ratnagiri : ‘तीनसान’ नाटकाची भावस्पर्शी कहाणी

रत्नागिरी : तीनसान या नाटकाने विभक्त कुटुंबाची कथा मांडताना, दत्तक मुलाच्या संवेदनशील नात्याचा पदर उलगडला. लाडात वाढलेल्या मुलाने लग्नानंतर आई-वडिलांना दिलेले दुःख, आणि त्यामागील सत्य उघड झाल्यावर होणारा पश्चात्ताप यामुळे प्रेक्षकांचे डोळे पाणावले. राज्यनाट्य स्पर्धेच्या रत्नागिरी केंद्रावर गुरुवारी लेखक व दिग्दर्शक अमर खामकर यांच्या ‘तीनसान’ या नाटकाचा प्रयोग अत्यंत भावुक वातावरणात पार पडला. लग्नानंतर मुलगा कसा बदलतो, पत्नीच्या नादात आई-वडिलांपासून वेगळा होतो आणि या विभक्त होण्यामागील एक हृदयद्रावक सत्य त्याला कसं उशिरा समजतं, याची कहाणी या नाटकातून प्रभावीपणे मांडण्यात आली.

संजय आपल्या आई-वडिलांचा अत्यंत लाडका मुलगा असतो. मोठे झाल्यावरही आई-वडील त्याला प्रेमाने घास भरवतात. सकाळी ऑफिसला जाण्यापूर्वी आईच्या हातचा घास खाल्ल्याशिवाय तो घरातून बाहेर पडत नसे. त्याचे एका मुलीवर प्रेम जडते आणि आई-वडील मोठ्या उत्साहाने त्याचे लग्न लावून देतात. सुरुवातीला काही दिवस आनंदात जातात, परंतु हळूहळू सासू आणि सुनेमध्ये खटके उडू लागतात. अशावेळी संजय आपल्या पत्नीची (शोभा) बाजू घेतो, ज्यामुळे त्याच्या आई-वडिलांना खूप त्रास होतो. परिस्थिती इतकी बिघडते की, संजय शहरात वेगळे राहण्याचा निर्णय घेतो.

संजय आणि त्याची पत्नी घर सोडून निघून जातात. हा धवका वडिलांना सहन होत नाही आणि त्यांना हृदयविकाराचा झटका येतो. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले जाते. शेजारचे गोपू काका संजयला ही बातमी देतात, पण संजय येत नाही. वडिलांना दवाखान्यातून घरी आणले जाते.

गोपू काका शेवटी संजयला ईमेलद्वारे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतातः संजय दत्तक मुलगा आहे! मुंबईतील बॉम्बस्फोटात आई-वडिलांचा छोटा मुलगा (ज्याचे नावही संजय होते) मरण पावतो. त्याचवेळी त्याच्या वयाचा एक मुलगा (संजय) अनाथ झालेला असतो, ज्याचे आई-वडील बॉम्बस्फोटात मरण पावलेले असतात. या मुलाला घरी आणून त्याला संजय हे नाव दिले जाते आणि मोठ्या लाडाने वाढवले जाते. मेल वाचून संजयला आपल्या कृत्याचा प्रचंड पश्चात्ताप होतो आणि तो तातडीने घरी परततो. पण, त्याला घरी पोहोचेपर्यंत वडिलांचा मृत्यू झालेला असतो. वडिलांचा मृत्यूचा धक्का आईला सहन होत नाही आणि तीदेखील प्राण सोडते. संजय घरी येतो, तेव्हा त्याला आपल्या आई-वडिलांचे निष्प्राण शरीर दिसते. खूप उशीर झालेला असतो. संजय आपल्या निर्णयाचा आणि वागणुकीचा पश्चात्ताप करतो.

यामध्ये वडिलांची भूमिका रवींद्र कांबळे, आई मयुरा डोमणे, संजय – संदीप कांबळे, शोभा – मुक्ता शिर्के, गोपू – वेदांत झगडे, जॉन – सुमेध कांबळे यांनी भूमिका केली. यामध्ये आई व शोभा यांची भूमिका लक्षवेधी ठरली. तर प्रकाश योजना सागर सकपाळ, पार्श्वसंगीत श्रुती पवार, रंगभूषा नरेश पांचाळ, वेशभूषा – आकांक्षा खामकर, नेपथ्य सुधाकर पांचाळ यांनी काम पाहिले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
2:13 PM 22-Nov-2025