निवडणूक काळात वाद होणार नाहीत, याची काळजी घ्या : उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम

देवरूख : निवडणुकीच्या काळामध्ये उमेदवारांसह कार्यकर्त्यांमध्ये एक जोश असतो. जोशामध्येच विरोधकांवर टीका टीपणी होत असते. यातून आपापसांत एकमेकांमधील वाद विवाद होण्याची शक्यता असते, हे वाद होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांनी देवरुख नगर पंचायतीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या बैठकीत केले.

शनिवारी नगरपंचायत सभागृहात ही बैठक पार पडली. यावेळी व्यासपीठावर तहसीलदार अमृता साबळे, पोलीस निरीक्षक उदय झावरे, मुख्याधिकारी प्रशांत भोसले उपस्थित होते. यावेळी श्री. कदम यांनी मार्गदर्शन करताना आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याबाबत माहिती दिली. निर्णय निवडणूक कालावधीत सोशल मीडिया वापरताना घ्यावयाची काळजी, मतमोजणीदरम्यान तसेच विजयी उमेदवारांचे वर्तन चांगले असावे, असे नमूद करून विस्तृत मार्गदर्शन केले.

निवडणुकीच्या कालावधीमध्ये वादविवाद झाल्यास त्याचे गंभीर परिणाम उमेदवार व कार्यकर्त्यांना भोगावे लागतात याबाबत वादविवाद होणार नाहीत, याची काळजी घेण्याचे आवाहन केले. यावेळी विविध विषयांवर आदर्श आचारसंहिता तसेच कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने मार्गदर्शकपर सूचना देखील देण्यात आल्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:53 AM 24/Nov/2025