रत्नागिरी : पोलिस पडताळणी न करता आठ खलाशांना स्वतःच्या दोन बोटींवर ठेवून पोलिसांच्या लेखी आदेशाची पायमल्ली केल्याप्रकरणी बोट मालकाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजगर अब्दुल लतीफ कोतवडेकर (रा. मिरकरवाडा, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या बोटमालकाचे नाव आहे. ही कारवाई बुधवारी (ता. १९) सायंकाळी मिरकरवाडा जेटीसमोरील समुद्राच्या पाण्यात एक नॉटिकल मैल अंतरावर करण्यात आली.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, शहर पोलिसांकडून ३० नोव्हेंबरला मिरकरवाडा जेटी व अन्य जेटीच्या ठिकाणी असलेल्या मच्छीमार बोटमालकांना त्यांच्या बोटीवर असलेल्या परराज्यातील व परदेशातील खलाशांचे पोलिस पडताळणी (व्हेरिफिकेशन) करून घेण्याबाबत व तसे न केल्यास बोट मालकांना जबाबदार धरून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशा प्रकारचा आदेश देण्यात आला होता.
तसा आदेश मिळाल्याबाबत बोट मालकांच्या सह्यादेखील घेण्यात आल्या होत्या. त्याप्रमाणे बोट मालकांकडून कार्यवाही होणे अपेक्षित होते, असे असतानाही संशयित अजगर कोतवडेकरने या आदेशाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून त्याच्या ताब्यातील दोन बोटींवर आठ खलाशांना पोलिस पडताळणी न करता ठेवून घेतले होते. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल अभिजित गायकवाड यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:28 AM 24/Nov/2025












