Dapoli : साखळोली-शिवाजीनगर पुलाची दयनीय अवस्था

दापोली : कोकणातील पर्यटननगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दापोली तालुक्यातील विकासाच्या दाव्यांना साखळोली-शिवाजीनगर रस्ता आणि येथील जीर्ण पुलाने साफ खोडा काढला आहे. रस्त्यातील खड्डे, उघड्यावर आलेल्या लोखंडी सळ्या आणि तुटलेल्या पुलाची अवस्था पाहता ‘रस्त्यात खड्डे की, खड्यात रस्ता ?’ असा संतापजनक प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.

साखळोली-शिवाजीनगरला जोडणारा पूल पूर्णपणे जीर्ण झाला आहे. पुलाचे कठडे ठिकठिकाणी तुटले असून, पाया कमकुवत झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. पावसाळ्यात पुलावरून जोरात पाणी वाहते तर उर्वरित काळात शालेय मुले, वृद्ध, महिला यांना जीव मुठीत धरून पुलाचा वापर करावा लागतो. एखादा अनर्थ ओढवल्यास जबाबदार कोण? असा सवाल ग्रामस्थ प्रशासनाला विचारत आहेत. रस्त्यावरील डांबरीकरण टच्या पूर्णपणे उखडले असून, उघड्यावर आलेल्या लोखंडी शिगांमुळे अपघाताचा धोका आणखी वाढला आहे.

मोठे खड्डे आणि असमतोल रस्ता यामुळे दुचाकीस्वारांना कसरत करत वाहन चालवावे लागत आहे. ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला आणि रुग्णांना दवाखान्यात नेणे ही रोजची परीक्षा बनली आहे. खराब रस्त्यांमुळे रिक्षाचालकही या मार्गावर जाण्यास नकार देत असल्याने ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. साखळोली आणि शिवाजीनगर येथील ग्रामस्थांनी प्रशासनाला वारंवार निवेदने देऊनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:22 PM 24/Nov/2025