वाढीव पेन्शनपासून राजापुरातील ८७९ दिव्यांग बांधव वंचित

राजापूर : दिव्यांग बांधवांना राज्य शासनातर्फे देण्यात येत असलेल्या पेन्शनमध्ये वाढ केली आहे. त्याबाबतचे शासन निर्णयाचे परिपत्रकही काढण्यात आले आहे. त्या परिपत्रकाची प्रशासनाकडून अंमलबजावणी झालेली दिसत नाही.

तालुक्यातील १ हजार दिव्यांगांपैकी केवळ १२१ दिव्यांगांना लाभ मिळत असून तब्बल ८७९ दिव्यांग वाढीव पेन्शनच्या लाभापासून वंचित राहिलेले आहेत. महसूल प्रशासानकडून केवळ वरिष्ठ पातळीवर प्रस्ताव पाठविला आहे असे ठोकळेबाज उत्तर देऊन जबाबदारी झटकली जात आहे. या विरोधात तीव्र संताप व्यक्त करीत दिव्यांग बांधवांनी तहसील कार्यालयात ठिय्या दिला.

माजी राज्यमंत्री व प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर दिव्यांग बांधवांसाठी महाराष्ट्र शासनाने संजय गांधी निराधार व दिव्यांग पेन्शन योजनेमध्ये एक हजार रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे दिव्यांगाची दीड हजारावरून अडीच हजार पेन्शन झाली असून त्याची सप्टेंबर महिन्यापासून अंमलबजावणी सुरू झाली आहे. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक दिव्यांग बांधव वाढीव पेन्शनच्या लाभापासून वंचित आहेत. त्यामध्ये राजापूर तालुक्यातीलही दिव्यांग बांधवांचा समावेश आहे. याबाबत प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष आनंद त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग बांधवांनी तहसील कार्यालयामध्ये धडक देत ठिय्या दिला.

शासनाने नव्याने जाहीर केलेला युडीआयडी कार्ड क्रमांक टाकल्यानंतर संजय गांधी निराधार योजनेतील वाढीव पेन्शनचा लाभ मिळण्यासाठी दिव्यांगांची नोंद होणार आहे. त्यामुळे राजापूर तहसील कार्यालयामध्ये तालुक्यातील सर्व दिव्यांगांनी युडीआयडी कार्ड व आधार कार्ड जमा केले. मात्र, दोन महिन्यानंतरही तालुक्यातील अनेक दिव्यांग बांधव पात्र असूनही प्रत्यक्ष लाभापासून वंचित आहेत.

माजी राज्यमंत्री व प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी सातत्यपूर्ण केलेल्या संघर्षानंतर दिव्यांग बांधवांसाठी महाराष्ट्र शासनाने संजय गांधी निराधार व दिव्यांग पेन्शन योजनेमध्ये एक हजार रुपयाची वाढ करून दिव्यांग पेन्शन अडीच हजार रुपये केली. शासन परिपत्रकही निघाले. मात्र, स्त्नागिरी जिल्ह्यातील असंख्य दिव्यांगांना अद्यापही हजार ५०० रुपये पेन्शन खात्यात जमा होत आहे. हा अन्याय खपवून घेतला जाणार आहे. वाढीव पेन्शनचा लाभ सर्व लाभार्थ्यांना मिळाला पाहिजे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल-आनंद त्रिपाठी, जिल्हाध्यक्ष

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:15 PM 24/Nov/2025