निवृत्त शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न : प्रभाकर खानविलकर

रत्नागिरी : “सेवानिवृत्तांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर सर्व पदाधिकारी प्रामाणिकपणे काम करत आहेत. नवीन परिपत्रकानुसार, जिल्हा कोषागारमधून सेवानिवृत्तांना ओळखपत्र मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

सेवानिवृत्तांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सदैव कटिबद्ध आहोत,” असे प्रतिपादन रत्नागिरी जिल्हा परिषद सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर खानविलकर केले. चिपळूणच्या प्राथमिक शिक्षक पतपेढीत झालेल्या स्नेहमेळाव्यात ते बोलत होते. चिपळूण तालुकाध्यक्ष प्रकाश शिंदे व सचिव चंद्रकांत जंगम यांनी मान्यवरांचे स्वागत केले. जिल्हा संघटना नेते उदय शिंदे यांनी २०२३ पासून संघटनात्मक केलेल्या कामाची माहिती दिली. मेळाव्यात सेवानिवृत्त शिक्षकांचे प्राथमिक फंड, गटविमा, पीपीओ अंश राशीकरण व उपदान, १ जुलै काल्पनिक वेतनवाढ, सातवा वेतन आयोग हप्ता रक्कम, केंद्रप्रमुख पदोन्नती वेतनवाढ व रजा रोखीकरण अशा अनेक आर्थिक प्रलंबित विषयांबाबत मार्गदर्शन केले. भविष्यात या प्रलंबित आर्थिक बाबी वेळेवर पूर्तता झाल्या नाहीत, तर प्रशासनाविरोधात सनदशीर मार्गाने संघर्ष करावा लागेल, असे मत राज्य प्रतिनिधी राजाराम सावंत व रत्नागिरी तालुकाध्यक्ष शंकर वरक यांनी मनोगतातून व्यक्त केले.

स्वाभिमानी संघटनेत समाविष्ट
आपली संघटना महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी सेवानिवृत्त शिक्षक व अधिकारी, महाराष्ट्र राज्य संघटनेत समाविष्ट होत असल्याचे राज्यनेते भरत वडगावकर यांनी जाहीर केले. या स्नेहमेळाव्याला राज्य सरचिटणीस अनिल मोहिते, विभागीय अध्यक्ष धोंडिराम कोष्टी, राज्य संघटक उमराव रास्ते, जिल्हा संघटक सांगली गुलाबराव भोसले यांनी राज्यस्तरावर संघटनात्मक सुरू असलेल्या कामकाजाबाबत माहिती दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:12 PM 24/Nov/2025