राजापूर : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर परिमंडळाकरिता वन विभागातील १२ मजूर प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी लवकरच मिळणार आहे. याबाबत रयत क्रांती संघटनेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी वनमंत्री गणेश नाईक यांना निवेदन सादर करून तशी मागणी केली आहे. याकामी आमदार खोत यांचे स्वीय सहायक आदिनाथ कपाळे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.
विस्ताराने मोठा असलेल्या राजापूर तालुका परिमंडळामध्ये २४८ गावांचा समावेश होतो. सदर गावांमध्ये मानव वन्यजीव संघर्षाच्या घटना वारंवार घडत असतात, तसेच गवा, बिबट्या, वानर, माकड इ वन्यप्राण्यांकडून प्राणघातक हल्ल्याच्या आणि रेस्क्यूच्या घटना वारंवार घडत असतात. सदयस्थितीत राजापूर परिमंडळामध्ये १ वनपाल व ०१ वनरक्षक एवढा कर्मचारी वर्ग कार्यरत आहे. सदर वन्यजीव संरक्षणांच्या कामांकरिता तसेच प्राणघातक हल्ला होऊ नये आणि झालाच तर त्याच्या उपाय योजनाकरिता उपलब्ध कर्मचारीवर्ग हा अपुरा पडत आहे. सदर परिमंडळामध्ये तात्पुरत्या स्वरुपात वनमजुरांची उपलब्धता झाल्यास वन्यजीव संरक्षण व संवर्धनाच्या काम अधिक सुलभ व तत्परतेने करणे शक्य होईल.
तरी पंचायत समिती गण निहाय १ मजूर असे १२ पंचायत समिती गण एकूण १२ मजूर प्रस्तावांला प्रशासकीय मंजुरी मिळून अनुदान उपलब्ध होण्याबाबतचा प्रस्ताव अनेक दिवसांपासून प्रशासनाकडे प्रलंबित आहे. काही दिवसांपूर्वी तुळसवडे गावातून जाताना आडवली गावचे ग्रामस्थ सुभाष पवार हे रिक्षा घेऊन चालले होते. त्यांच्यावर बिबट्याने प्राणघातक हल्ला केला असून ते सुदैवाने बचावले, परंतु गंभीर दुखापत झाली. अशा अनेक घटना आपल्या राजापूर तालुक्यात घडत आहेत, परंतु वनविभागात कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने अशा घटना आटोक्यात येणे अशक्य आहे.
यासंदर्भात तत्काळ निर्णय घेऊन सदर प्रस्ताव मंजूर करण्याबाबत रयत क्रांती संघटनेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी मंत्रालयात राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. यावर वनमंत्री नाईक यांनी सकारात्मक भूमिका घेत सदर प्रस्ताव मंजूर करण्याबाबत वनखात्याच्या अप्पर मुख्य सचिवांना आदेश दिले आहेत. या कामात आमदार सदाभाऊ खोत यांचे स्वीय सहायक आदिनाथ कपाळे यांनी पुढाकार घेतला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:55 AM 25/Nov/2025












