संगमेश्वर : देवरूख साखरपा मार्गावर महावितरणकडून नवीन विद्युत खांब उभारण्यात येत आहेत; पण ते काही ठिकाणी रस्त्याच्या बाजूपट्टीवर उभे केले आहेत, तर काही ठिकाणी रस्त्याच्या अगदी जवळ आहेत. सामान्यतः विजेचे खांब हे रस्त्यापासून सुरक्षित अंतरावर उभारणे आवश्यक आहे; परंतु या गोष्टीकडे संबंधितांनी कानाडोळा केला आहे. त्यामुळे अपघात घडण्याचा धोका वाढला आहे.
देवरूख येथील चारुदत्त तळेकर यांनी काम करणाऱ्यांकडे परवानगी पत्र मागितले असता पत्र दाखवण्यास नकार दिला. तळेकर यांना माहितीच्या अधिकारात प्राप्त झालेल्या माहितीनुसार, संबंधितांनी सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी घेतली नसल्याची माहिती अधिकारातील पत्रात उत्तर मिळाले आहे.
संबंधित ठेकेदाराला रस्त्याच्या मध्यबिंदूपासून १५ मीटर अंतरावर खांब उभे करण्याबाबत सूचना बांधकाम विभागाने दिल्या आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. एखादे काम भविष्याचा विचार करून ठरलेल्या निर्देशानुसार पूर्ण होणे आवश्यक असते; परंतु सद्यःस्थितीत झटपट काम उरकण्याची घाई नेमकी काय झाली आहे, हा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो. स्थानिकांच्या तक्रारीनुसार, खांब उभे करताना आवश्यक ती काळजी घेतलेली नाही. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभाग प्रत्यक्ष घटनास्थळी तपासणीसाठी कधी पोहोचणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:13 AM 25/Nov/2025












