◼️ “कोकण वाऱ्यावर सोडले का?”, एबी फॉर्मवरून आणि ‘मॅनेज’ राजकारणावरून मुर्तुझांचा स्फोटक खुलासा; तटकरेंच्या मदतीने अजित पवार गटात प्रवेश
रत्नागिरी : रत्नागिरी नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (शरद पवार गट) मोठी पडझड झाली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे सरचिटणीस बशीर मुर्तुझा यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटाला रामराम ठोकून अजित पवार गटात प्रवेश केला आहे. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुर्तुझा यांनी शरद पवार गटाच्या शहरप्रमुखांवर आणि एकूणच स्थानिक नेतृत्वावर ‘मॅनेज’ झाल्याचा आणि कट रचल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.
“एका सीटसाठी पक्षाचा बळी दिला”
बशीर मुर्तुझा यांनी शहरप्रमुखांवर निशाणा साधताना म्हटले की, “शहरप्रमुख स्वतःच्या एका सीटसाठी लाचार झाले आहेत. ते शिवाजीनगरमध्ये राहतात, पण निवडणूक लढवण्यासाठी त्यांना ‘किल्ला’ प्रभागाचे तिकीट हवे होते. स्वतः निवडून येण्यासाठी त्यांना उद्धव ठाकरे गटाची (उबाठा) मते हवी होती, म्हणून त्यांनी पक्षाची बाजू कमकुवत करून ‘उबाठा’ गटाशी जुळवून घेतले.”
एबी फॉर्मवरून घोळ आणि ‘कट’कारस्थान
पक्षांतर्गत कटकारस्थानाचा पर्दाफाश करताना मुर्तुझा म्हणाले, “मी राज्याचा सरचिटणीस आहे. प्रोटोकॉलप्रमाणे एबी फॉर्म (AB Form) माझ्याकडे यायला हवे होते. पण ते माझ्याकडे येऊ दिले नाहीत. हा माझ्याविरोधात रचलेला कट होता. शेवटच्या क्षणापर्यंत मला वेळ द्यायचा नाही आणि माझी कोंडी करायची, जेणेकरून मी निवडणूक लढवू शकणार नाही आणि माझी मते त्यांना मिळतील, असे त्यांचे नियोजन होते.”
“कोकण वाऱ्यावर सोडले का?”
शरद पवार गटाच्या वरिष्ठ नेतृत्वावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. “सिंधुदुर्गचा निरीक्षक असूनही मला तिथले एबी फॉर्म पाठवले नाहीत. रत्नागिरीत निरीक्षक पाठवले नाहीत, तेही ‘मॅनेज’ झाले होते. पार्लमेंटरी बोर्ड स्थापन करण्यासाठी मी पत्र देऊनही त्याची दखल घेतली नाही. पक्षाने कोकण जणू वाऱ्यावरच सोडून दिले आहे का?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.
“उबाठा पेक्षा राष्ट्रवादी ताकदवान, तरीही…”
मुर्तुझा पुढे म्हणाले की, “विधानसभेनंतर अनेक मोठे नेते (राजन साळवी, बंड्या साळवी) शिवसेना (उबाठा) सोडून गेल्याने त्यांची ताकद कमी झाली आहे. त्यामानाने राष्ट्रवादीची व्होट बँक मजबूत होती. तरीही ‘उबाठा’ला झुकते माप दिले गेले. माझ्या प्रभागात माझी सीट स्ट्रॉंग असतानाही तिथे मला तिकीट नाकारण्याचा प्रयत्न झाला.”
तटकरेंनी दिला हात
“जेव्हा माझ्याच पक्षाने माझे तिकीट कापण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सुनील तटकरे साहेबांनी मला ऐनवेळी हात दिला. त्यामुळेच मी अजित पवार गटातून निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकलो,” अशी कबुली मुर्तुझा यांनी दिली.
“माझ्याकडे रेकॉर्डिंग आहेत”
शहरप्रमुख आणि निरीक्षक कशाप्रकारे ‘मॅनेज’ झाले आहेत, याचे पुरावे आपल्याकडे असल्याचे मुर्तुझा यांनी सांगितले. “माझ्याकडे कॉल रेकॉर्डिंग आहेत. आता निवडणुकीचा काळ आहे म्हणून मी शांत आहे, पण योग्य वेळी मी ते पुरावे बाहेर काढेन,” असा इशाराही त्यांनी दिला.
रत्नागिरीत आता बशीर मुर्तुझा यांच्या पत्नी वहिदा मुर्तुझा या अजित पवार गटाकडून नगराध्यक्षपदासाठी रिंगणात असल्याने लढत अत्यंत चुरशीची होणार आहे. त्यांच्या या बंडखोरीचा फटका शरद पवार गट आणि महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:19 25-11-2025














