Shivani Sawant- Mane | वचननामा पाच वर्षांत पूर्ण करू : शिवानी सावंत-माने

रत्नागिरी : रत्नागिरी शहर हे आपले संपूर्ण कुटुंब आणि परिवार आहे. त्यामुळे ही निवडणूक माझ्यासाठी नसून, रत्नागिरीकरांसाठी आहे. या वचननाम्यामध्ये शहर विकास, रोजगार, आरोग्य, शिक्षण आणि पारदर्शक कारभारावर भर आहे. निवडून आल्यावर नगराध्यक्षपदाचा कारभार मी, ३२ नगरसेवक आणि मुख्याधिकारी चालवू. वचननाम्यात जाहीर केलेल्या सर्व योजना पाच वर्षांच्या आत पूर्ण करू, अशी ग्वाही महाविकास आघाडीच्या उमेदवार शिवानी माने यांनी दिली. तसेच पालिकेचा कारभार माझे पती, माझे सासरे न चालविणार नाहीत असेही त्यांनी सांगितले.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या रत्नागिरी नगरपालिकेच्या उमेदवार शिवानी सावंत-माने वचननामा प्रकाशनावेळी बोलत होत्या. यावेळी उपनेते बाळ माने, रत्नागिरी तालुका महिला संपर्कप्रमुख दीक्षा आंब्रे, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, मिहिर माने, विराज माने आदी उपस्थित होते.

शिवानी माने म्हणाल्या, युवा, महिला आणि शहरविकास याला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. शहरातील आतापर्यंत न झालेल्या विकासकामांवर अधिक लक्ष केंद्रीत केले जाईल. तसेच रोजगार व युवा, महिला सक्षमीकरण योजना राबवून महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक यांच्याकरिता सुविधा उपलब्ध केल्या जातील. जनतेचे प्रश्न थेट समजून घेण्यासाठी नगराध्यक्ष आपल्या दारी हा जनता दरबार महिन्यांतून एकदा आयोजित केला जाईल आणि नगराध्यक्षांचे दालन नागरिकांसाठी कायम खुले ठेवले जाईल. याशिवाय कॉलेज क्षेत्रातील २५ निवडक युवकांना ‘युवा नगर सभा’ अंतर्गत नगर परिषदेच्या कारभारात सहभागी करून घेतले जाईल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:37 AM 26/Nov/2025