रत्नागिरी : पावसाळी मासेमारी बंदीनंतर १ ऑगस्टपासून मासेमारी हंगाम सुरु झाला. परंतु, नोव्हेंबरपर्यंत लांबलेला पाऊस, वादळी वाऱ्याच्या धोक्याच्या इशाऱ्यांमुळे ऑगस्ट ते नोव्हेंबरपर्यंतचा मासेमारी हंगाम निसटून गेला आहे. बदललेल्या या वातावरणामुळे नौकांना मासळी मिळेनाशी झाली आहे. त्यामुळे मत्स्य तज्ज्ञांचा सल्ला घेऊन मत्स्य दुष्काळ जाहीर करुन मच्छीमारांना आर्थिक मदत देण्याची मागणी करणारे निवेदन भाजपा अल्पसंख्याक मोर्चा दक्षिण जिल्हाध्यक्षांनी मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांना दिले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात ३ हजार ३८७ मच्छीमार नौका आहेत. यामध्ये १ हजार ९०८ ट्रॉलींग, ३९० मिनीपर्ससिंन १ हजार ८९ गिलनेटींग नौका आहेत. या नौकांना १ ऑगस्टपासून पूर्ण क्षमतेने मासेमारी करता आलेली नाही. नोव्हेंबरपर्यंत पाऊस लांबला. विविध वादळांच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाच्या इशाऱ्यांमुळे नौका बंदरातच उभ्या करुन ठेवाव्या लागल्या; परंतु नौकांवर काम करणाऱ्या तांडेल, पागी, खलाशांचे आठवड्याचे पगार करावेच लागले. त्याचबरोबर त्यांच्या रोजच्या जेवणावरही खर्च झाला आहे. बदललेल्या वातावरणामुळे समुद्रात जाणाऱ्या नौकांना मासळीही मिळत नाही. त्यामुळे हा खर्चसुद्धा अंगावर पडला आहे.
मच्छीमार नौकांना मासळी मिळत नसल्याने नौका बांधणीसाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते थकले आहेत. मासळी मिळत नसल्याने मासळीची खरेदी विक्री करणाऱ्या महिलांचेही नुकसान झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनीसुद्धा मिरकरवाडा बंदराला भेट देऊन मच्छीमारांच्या परिस्थितीची पाहणी केली आहे. अशावेळी मच्छीमारांना मदतीचा हात मिळावा यासाठी मत्स्यतज्ञांचा चौकशी अहवाल घेऊन मत्स्य दुष्काळाची मदत जाहीर करण्याची मागणी अल्पसंख्यांक नेते अब्दुल बिजली खान यांनी केली आहे. यांसदर्भात त्यांनी मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांना निवेदन दिले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:25 AM 28/Nov/2025














