गुहागर : रत्नागिरी जिल्ह्यात विधानसभा निवडणुकांपेक्षाही महायुतीसाठी चांगले वातावरण आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नगरपरिषद, नगरपंचायतीमधील सर्व जागा महायुती जिंकेल, असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी गुहागरमध्ये केले. यावेळी त्यांनी गुहागर बाजारपेठेत युतीच्या उमेदवाराचा प्रचार केला.
गृह राज्यमंत्री योगेश कदम आज गुहागरमध्ये आले होते. त्यांनी गुहागर शहरातील युतीच्या उमेदवारांचा आढावा घेतला. त्यानंतर बाजारपेठेत व्यापारी आणि नागरिकांची भेट घेतली. युतीच्या उमेदवारांच्या पाठीशी उभे रहाण्याचे आवाहन केले. युतीच्या उमेदवारांना निवडून द्या त्यानंतर पुन्हा आपल्या भेटीसाठी येईन, असे आश्वासन यावेळी कदम यांनी दिले. दरम्यान, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सिंधुदुर्गमधील भाजप व शिवसेनेमधील वादावर बोलताना ते म्हणाले की, महायुती म्हणून एकत्र काम करावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
मात्र, या निवडणुका स्थानिकांच्या असल्यामुळे काही ठिकाणी मित्रपक्षच समोरासमोर ठाकले आहेत. अशावेळी मैत्रीपूर्ण लढती व्हाव्यात अशी अपेक्षा होती. मात्र, सिंधुदुर्गमध्ये जे काही चालले आहे याची माहिती मंत्री नीतेश राणे आणि आमदार नीलेश राणे यांनी वरिष्ठांकडे कळवली असेल. त्यामुळे त्यामध्ये वरिष्ठ नेते योग्य तो निर्णय घेतील. जी काही रक्कम सापडली ती निवडणूक आयोगाने ताब्यात घेतलेली असल्यास त्याचा निर्णय निवडणूक आयोग घेईल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:54 AM 28/Nov/2025














