खेड : गृहराज्यमंत्र्यांच्या मतदारसंघात निवडणूक भयमुक्त व्हायला हवी होती; पण येथे उमेदवारांवर दडपण, धमक्या, रात्री-अपरात्री दादागिरी-भाईगिरी सुरू आहे. पण या दडपणाला न घाबरता उभे राहणाऱ्या आमच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी आम्ही भक्कम आहोत, अशी आक्रमक टीका शिवसेनाचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांनी बुधवारी खेडमध्ये आयोजित एका सभेत केली.
यावेळी विक्रांत जाधव यांनी सत्ताधाऱ्यांवर थेट धारदार शब्दांत हल्ला चढवला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी शरद पवार, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अजित पवार या चार पक्षांच्या आघाडीकडून २० सदस्य पदे आणि नगराध्यक्षपदासाठी संयुक्त उमेदवारी देण्यात आली आहे.
जाधव म्हणाले, खेडमध्ये स्वतःला दिग्गज समजून सल्ले देणाऱ्यांनी एक भलताच नवा पायंडा पाडला आहे. प्रभाग ५ व मधील आमच्या महिला उमेदवाराला अर्ज मागे घेण्याची तारीख उलटून गेल्यानंतर जबरदस्ती प्रतिज्ञापत्र देऊन माघार जाहीर करण्यास भाग पाडले गेले. कोकणात असा काळाकुट्ट प्रकार कधीच घडला नव्हता. हिंमत असेल तर सरळ मैदानात उतरा, लढा आणि जिंकून दाखवा. जनतेला थेट आवाहन करताना त्यांनी या घडामोडींमुळे खेडचे नाव बदनाम होऊ नये, असे सांगितले. खेडच्या विकासासाठी आमचे नेते भास्कर जाधव आणि माझा जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा अनुभव पूर्ण ताकदीने कामाला लावू, असे विक्रम जाधव यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमाला काँग्रेसचे गौस खतीव, माजी नगराध्यक्ष अरविंद तोडकरी, शेखर पाटणे, दत्ताराम भिलारे, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सपना कानडे तसेच आघाडीचे सर्व उमेदवार आणि कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, या एकंदर परिस्थितीवरुन नगर परिषद निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापू लागले आहे असे दिसते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:04 PM 28/Nov/2025














