रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी): रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता उबाठा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवणारी आपली मुलगी शिवानी माने हिच्या प्रचारासाठी जोरदार मैदानात उतरले आहेत. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत राजेश सावंत यांनी गेल्या ५ ते ८ वर्षांतील रत्नागिरीच्या कारभारावर बोट ठेवत सत्ताधाऱ्यांच्या ‘विकासाच्या’ दाव्यांची अक्षरशः चिरफाड केली. पाणी योजना, भुयारी गटार, कचरा प्रकल्प आणि पंतप्रधान आवास योजना यांवरून त्यांनी प्रशासनाला आणि सत्ताधाऱ्यांना थेट जाब विचारला आहे.
या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे आणि राजेश सावंत यांनी केलेले गंभीर आरोप खालीलप्रमाणे आहेत:
१. ५४ कोटींच्या पाणी योजनेचे तीनतेरा
राजेश सावंत यांनी रत्नागिरीतील पाणीपुरवठा योजनेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, “शहराला पाणी ही प्राथमिक गरज आहे, पण ती पूर्ण करण्यात सत्ताधारी अपयशी ठरले आहेत. २०१६ मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी ५४ कोटींची पाणी योजना मंजूर केली होती. त्यावेळी निविदा १६% जादा दराने (Above Rate) देण्यात आली. मी त्यावेळी सत्ताधारी पक्षात असूनही जनतेच्या पैशांची उधळपट्टी होऊ नये म्हणून याला विरोध केला होता. आज २०२५ उजाडले तरी ही योजना पूर्ण झालेली नाही.”
- जीवन प्राधिकरणाच्या अहवालानुसार, ठेकेदाराने अजूनही योजनेची चाचणी (Testing) दिलेली नाही.
- असे असतानाही नगरपरिषदेने ही योजना ताब्यात कशी घेतली? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
- रस्त्यांमध्ये पाईप फुटत आहेत, त्यामुळे केलेले रस्ते पुन्हा खोदावे लागत आहेत.
२. रस्ते आणि भुयारी गटार योजनेचा अभाव
शहरात सध्या सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांवरही सावंतांनी भाष्य केले. “निवडणुका जवळ आल्यावर रस्ते कॉंक्रिटीकरण सुरू झाले आहे, पण त्याआधी भुयारी गटार योजना होणे गरजेचे होते,” असे ते म्हणाले.
- २०११ मध्ये मिलिंद कीर नगराध्यक्ष असताना ६००-७०० कोटींचा डीपीआर (DPR) तयार झाला होता, पण १४ वर्षांत त्यावर अंमलबजावणी झाली नाही.
- जोपर्यंत भुयारी गटार योजना होत नाही, तोपर्यंत रस्ते कितीही केले तरी सांडपाण्यामुळे ते खराब होणारच, असे मत त्यांनी व्यक्त केले.
३. कचरा प्रकल्प आणि सौर ऊर्जेची संधी हुकली
शहरातील कचरा प्रकल्पाबाबत बोलताना सावंत म्हणाले की, उमेश शेट्ये यांच्या काळात कचरा प्रकल्पासाठी जागा घेतली होती. मात्र, गेल्या ५ वर्षांत तिथे काहीच झाले नाही.
- “जर तिथे कचरा प्रकल्प करायचा नव्हता, तर किमान सौर ऊर्जा प्रकल्प (Solar Project) तरी राबवायला हवा होता. यामुळे नगरपरिषदेचे वार्षिक ९० लाख रुपयांचे वीज बिल वाचले असते,” असे गणित त्यांनी मांडले.
४. पंतप्रधान आवास योजना आणि गरिबांची फसवणूक
झोपडपट्टी निर्मूलन आणि पंतप्रधान आवास योजनेचा बोजवारा उडाल्याचे सावंत यांनी निदर्शनास आणून दिले. २०१४ मध्ये मोदी सरकारने ही योजना आणली, रत्नागिरीतील ७६३ झोपडपट्ट्यांचा सर्व्हे झाला, पण गरिबांना अजून पक्की घरे मिळाली नाहीत.
- “फेरीवाल्यांची नोंदणी झाली, पण त्यांना हक्काचा ‘फेरीवाला झोन’ मिळाला नाही. उलट त्यांना त्रास दिला जात आहे,” असा आरोप त्यांनी केला.
- काही भागात गरिबांना धमकावून मते मागितली जात असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला.
५. ही निवडणूक उदय सामंतांची नाही, तर नगरसेवकांची!
पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधांवर भाष्य करताना राजेश सावंत यांनी स्पष्ट केले की, “माझा लढा उदय सामंत यांच्या विरोधात नसून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कारभाराविरोधात आहे. मेडिकल कॉलेज किंवा विमानतळ आणले म्हणून पालकमंत्र्यांचे अभिनंदनच आहे, पण नगरपरिषदेच्या निवडणुकीत स्थानिक नगरसेवकांनी काय दिवे लावले? याचा हिशोब जनतेला द्यावा लागेल. पालकमंत्र्यांच्या क्रेडिटवर नगरसेवक किती दिवस निवडून येणार?”
६. रवींद्र चव्हाणांच्या ‘त्या’ विधानावर स्पष्टीकरण
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सावंत पक्षाचे घटक नसल्याचे म्हटले होते. यावर बोलताना सावंत म्हणाले, “ज्यावेळी मी भाजपमध्ये होतो, तेव्हा पक्षाचा आदेश म्हणून मी काम केले. आता मी माझ्या मुलीसाठी, एका सक्षम उमेदवारासाठी मैदानात आहे. ३ तारखेनंतर चित्र स्पष्ट होईल.” राजेश सावंत यांनी या पत्रकार परिषदेतून रत्नागिरीकरांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न मांडत सत्ताधाऱ्यांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. “जात-पात न बघता, केवळ विकासाच्या मुद्द्यावर आणि नव्या रक्ताला संधी देण्यासाठी शिवानी माने हिच्या पाठीशी उभे राहा,” असे आवाहन त्यांनी रत्नागिरीच्या जनतेला केले आहे.














