रत्नागिरी : नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने सर्व उमेदवारांना मोठा दिलासा दिला आहे. निवडणुकीसाठीच्या प्रचाराची मुदत एक दिवसाने वाढवण्यात आली असून, आता उमेदवारांना १ डिसेंबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत प्रचार करता येणार आहे. यापूर्वी प्रचाराची मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत होती. मात्र, मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पडावी आणि उमेदवारांना तयारीसाठी अधिक वेळ मिळावा यासाठी आयोगाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, मतदानाची प्रक्रिया सुरू होण्याच्या दिनांकाच्या ४८ तास आधी प्रचार थांबवणे आवश्यक असते. निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, २ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे, १ डिसेंबर रोजी रात्री १० वाजल्यापासून निवडणुकीचा प्रचार थांबवावा लागेल.
१ डिसेंबर, रात्री १० वाजल्यापासून सार्वजनिक सभा, मोर्चे आणि ध्वनिक्षेपकाचा वापर पूर्णपणे बंद राहील.निवडणूक प्रचाराशी संबंधित जाहिरात, प्रसिद्धी किंवा प्रसारणाचे कार्यदेखील त्याच वेळेपासून थांबवावे लागेल. २ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होणार आहे.
या मुदतवाढीमुळे उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी अतिरिक्त एक दिवस मिळणार असून, याचा फायदा निवडणुकीच्या निकालांवर काय परिणाम करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:44 28-11-2025














