“मी भाषणं ठोकत नाही, कामं करतो!” रत्नागिरी प्रभाग २ मध्ये निमेश नायर यांची भावनिक साद; कामांचा दिला लेखाजोखा

रत्नागिरी: “मला भाषणाची सवय नाही, माझे मित्र म्हणतात हा बोलायला चुकेल, पण मी गॅरंटी देतो की हा निमेश नायर काम करायला कधीच चुकणार नाही.” अशा शब्दांत रत्नागिरी नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक २ मधील महायुतीचे उमेदवार निमेश नायर यांनी मतदारांशी संवाद साधला. निमित्त होते रत्नागिरी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित महायुतीच्या प्रचार सभेचे.

या प्रचार सभेला राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत, महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नायर यांनी आपल्या ५ वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या विकासकामांचा सविस्तर आढावा मांडला.

भाषणां पेक्षा कामावर भर

आपल्या भाषणाची सुरुवात करताना निमेश नायर यांनी अत्यंत नम्रपणे कबूल केले की, ते उत्तम वक्ते नाहीत, परंतु उत्तम कार्यकर्ते नक्कीच आहेत. २०१६ मध्ये जेव्हा पहिल्यांदा तिकीट मिळाले, तेव्हा हा प्रभाग त्यांच्यासाठी नवीन होता. मात्र, नागरिकांनी आणि ज्येष्ठ नगरसेविका पावस्कर मॅडम यांनी टाकलेला विश्वास त्यांनी कामातून सार्थ ठरवला. “आम्ही आता लोकांकडे जाऊन ‘आम्ही हे करू, ते करू’ अशी आश्वासने देत नाही, तर ‘आम्ही हे काम केले आहे’ हे हक्काने सांगतो,” असे नायर यांनी स्पष्ट केले.

प्रभाग २ मधील प्रमुख विकासकामांचा आढावा:

निमेश नायर यांनी भाषणात प्रभागातील बदलत्या रूपाचा उल्लेख केला:

  • ड्रेनेज सिस्टीम सुधारणा: गवळीवाडा, मारुती मंदिर, सना अपार्टमेंट ते इम्तियाज काझी यांच्या घरापर्यंत आणि रिमांड होम परिसरात ड्रेनेजची व्यवस्था अद्ययावत केली.
  • TCM हायस्कूल साठी निधी: टीसीएम हायस्कूलची जागा बिल्डरला देणार, अशा अफवा पसरल्या होत्या. मात्र, नायर यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून शाळेसाठी ८० लाख रुपये मंजूर करून आणले आणि अफवांना कामातून उत्तर दिले.
  • पर्यटनाला चालना: कोकणातील एकमेव ‘थ्रीडी तारांगण’ (3D Planetarium) आणि विठ्ठल मूर्तीची स्थापना याच प्रभागात झाल्याने प्रभागाच्या सौंदर्यात भर पडली आहे.
  • केसीजन नगर व पारसदर्शन: केसीजन नगरमध्ये आरसीसी गटारे आणि गार्डन उभारले. तसेच पारसदर्शन बिल्डिंगजवळ संरक्षक भिंत (Retaining Wall) बांधून लोकांची सुरक्षितता जपली.

पाणी आणि आरोग्य सभापती म्हणून केलेले काम

नगरसेवक असताना मिळालेल्या जबाबदाऱ्या कशा पार पाडल्या, याचे उदाहरण देताना नायर म्हणाले:

  1. पाणीपुरवठा: शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टाक्यांमध्ये २५ वर्षांपासून साचलेला गाळ (सुमारे दीड ते दोन फूट) साफ करून घेतला. जॅकवेल कोसळल्यानंतर शहराचा पाणीपुरवठा २ महिने खंडित होण्याची भीती होती, मात्र युद्धपातळीवर काम करून अवघ्या २०-२२ दिवसांत नवीन जॅकवेल उभी केली आणि पाणीपुरवठा सुरळीत केला.
  2. आरोग्य सेवा: कोविड काळात नगरपरिषदेच्या माध्यमातून २८,००० नागरिकांचे लसीकरण केले. मांडवी बीचची स्वच्छता असो किंवा मच्छी मार्केटमधील दुर्गंधीची समस्या, स्वतः पुढाकार घेऊन ‘ऑड डे’ला मार्केट रिकामे करून स्वच्छता मोहीम राबवली.

“निमेष तू आहेस, म्हणून आम्ही निर्धास्त!”

भाषणाच्या शेवटी नायर यांनी काही भावनिक प्रसंग सांगितले. रात्री १२:३० वाजता एका जखमी व्यक्तीसाठी १० मिनिटांत मदतीला धावून गेल्याची आठवण त्यांनी सांगितली. तसेच, प्रभागातील एका रहिवाशाने (अभि देशपांडे) “तू इथे आहेस म्हणून मी कामानिमित्त बाहेरगावी निर्धास्त राहू शकतो,” असे म्हटल्याचे सांगताना नायर यांचा कंठ दाटून आला. हीच आपली खरी कमाई असल्याचे त्यांनी सांगितले. प्नरभागाला नवीन जोडल्या गेलेल्या भागातही ड्रेनेज आणि संरक्षक भिंतींचे प्रश्न निवडणुकीनंतर प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासन त्यांनी दिले. “मी तुमचा आहे, मी तुमच्यासाठी आहे आणि मी तुमच्यामुळे आहे.” अशी भावनिक साद देखील निमेश नायर यांनी भाषणाच्या शेवटी घातली.