रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान केंद्रे मतदारांच्या बडदास्तसाठी सज्ज झाली आहेत. मतदान केंद्रांच्या ठिकाणी मतदारांना सावली मिळावी, यासाठी मंडप टाकण्यात आले आहेत. सोबत पाणी आणि स्वच्छतागृहांचीही सोय करण्यात आली आहे. काही मतदान केंद्रांची आवश्यक ती दुरुस्ती करून घेण्यात आली असल्याचे रत्नागिरी नगरपरिषदेचे नगर अभियंता यतिराज जाधव यांनी सांगितले.
रत्नागिरी न.प.सह एकूण चार नगरपरिषदा आणि तीन नगरपंचायती अशा जिल्ह्यात एकूण सात ठिकाणी मतदान प्रक्रिया होणार आहे. नगरपरिषदांच्या निवडणुकीचे मतदान २ डिसेंबर रोजी होणार आहे. शहरातील ६४ हजार ७४६ मतदारांसाठी ६९ मतदान केंद्रे आहेत. गरज असलेल्या मतदान केंद्रांच्या ठिकाणी सावलीसाठी मंडप घालण्यात आले आहेत.
रत्नागिरी नगरपरिषदेने मतदान वाढीसाठी विविध उपक्रम राबविले आहेत. त्याचबरोबर राजकीय पक्षांच्या उमेदवारांनीही जोरदार प्रचार यंत्रणा राबविल्याने एकूण मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे. मतदान केंद्रांच्या ठिकाणी जेथे खिडक्या बदलणे किंवा दुरुस्त करणे आवश्यक आहे, त्याची पूर्तता करण्यात आली आहे. आवश्यक त्या ठिकाणी पार्टीशन टाकून घेण्यात आली
आहेत. दिव्यांगांसाठी रॅम्पचीही व्यवस्था करण्यात आली असल्याचे नगर अभियंता जाधव यांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:27 AM 29/Nov/2025














