ST Bus : जिल्ह्यात एसटीचे वेळापत्रक कोलमडले!

रत्नागिरी : थंडीच्या मौसमात शाळा- महाविद्यालयांकडून शालेय शैक्षणिक सहल दरवर्षी जात असते. यंदाच्या वर्षी ही शाळाकडून लालपरीलाच पसंती देण्यात आली आहे. रत्नागिरी विभागातील ३०० हून अधिक बसेसच्या बुकिंग झाल्या असून, सर्व नवीन बसेस बाहेर गेल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एसटीचे वेळापत्रक पुन्हा कोलमडले आहे. विद्यार्थी, प्रवाशांना तासन्तास एसटीची बाट पाहावी लागत आहे. नवीन बसेस सहलीला गेल्यामुळे जिल्हांतर्गत जुन्या बसेस रस्त्यावर धावत आहेत. त्यामुळे शाळेस, कामावर जाण्यास उशीर होत असल्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.

नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी हे तीन महिने शाळा-महाविद्यालयाकडून सहलीचे नियोजन करण्यात येत असते. रत्नागिरी जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयाकडून कोकणसह पुणे, कोल्हापूर, मराठवाडा यासह विविध ठिकाणी सहलीचे नियोजन करण्यात आले आहे.

जवळपास ३०० हून अधिक लालपरी बसेसचे बुकिंग झाले असून, दररोज २० हून अधिक बसेस रत्नागिरी विभागातून सहलीला सोडण्यात येत आहेत. एकीकडे सहलीला नव्या, जुन्या बसेस गेल्यामुळे मात्र जिल्हांतर्गत एसटी बसेसचे वेळापत्रक पुन्हा कोलमडले आहे.

एसटी बसेस वेळेवर येत नसल्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. लांबपल्ल्याची बस आली तरी ती पूर्णपणे भरून आलेली असते. त्यामुळे नाईलाजास्तव प्रवाशांना उभे राहून रत्नागिरीपर्यंतचा प्रवास करावा लागत आहे. याचा सर्वाधिक फटका लांजा, राजापूर, गुहागर, चिपळूणसह इतर ठिकाणच्या प्रवाशांना बसत आहे. ज्यांना उशीर होत आहे ते वडाप, खासगी बसेसचा आधार घेऊन आपले घर गाठत आहे. एसटी बसेसचे वेळापत्रक वारंवार कोलमडत असल्यामुळे प्रवाशांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

अपुऱ्या बसेस, कर्मचाऱ्यांची संख्या कमीचा फटका
सध्या रत्नागिरी विभागात चालक, वाहकांची कमतरता असून जागा भरल्याच गेल्या नाहीत. ५०० हून अधिक जागा चालक वाहकांच्या रिक्त आहेत. राजापूर, लांजा या मार्गावर कित्येकवेळा वाहकच नसतो. रत्नागिरीतूनच एक बाहक तिकीट काढतो आणि उतरतो. त्यानंतर मधील थांब्यावर प्रवासी घेत नाहीत. थेट लांजा, राजापूरला एसटी बस थांबते. तसेच अपुऱ्या बसेसमुळे ही जिल्हांतर्गत वेळापत्रक कोलमडत आहे.

रत्नागिरी विभागात सण, उन्हाळी सुट्टी, सहलीचे दिवस आल्यास बसेसचे वेळापत्रक बिघडते. त्यामुळे एसटी वेळेवर न आल्यास कामावर जाण्यास उशीर होते. नाईलाजास्तव जास्तीचे पैसे देऊन खासगी बस, वडापचा आधार घेऊन प्रवास करतो. लांजा, राजापूरच्या प्रवाशांचा सर्वाधिक फटका बसत आहे. एसटी विभागाने जिल्हांतर्गत प्रवाशांसाठी जादा बसेस राखीव ठेवणे गरजेचे आहे. राहुल माने, प्रयासी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:37 PM 05/Dec/2025