१५ वर्षांची परंपरा अविरत; भंडारी समाजाची नूतन दिनदर्शिका प्रकाशित, ५ जिल्ह्यांत होणार मोफत वितरण

रत्नागिरी : केवळ घरांच्या भिंतीवरच नव्हे, तर समाजबांधवांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या भंडारी समाजाच्या (Bhandari Samaj) नूतन २०२६ च्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा आज रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री भैरी मंदिर येथे भक्तीमय वातावरणात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

१५ वर्षांची गौरवशाली परंपरा गेली १५ वर्षे अविरतपणे सुरू असलेला हा उपक्रम समाज संघ आणि जाहिरातदार यांच्या संयुक्त विद्यमाने राबविला जातो. या उपक्रमाचे हे १६ वे वर्ष असून, यंदाही ही परंपरा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. विशेष म्हणजे, ही दिनदर्शिका केवळ रत्नागिरीपुरती मर्यादित नसून रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या कोकण पट्ट्यासह मुंबई आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये राहणाऱ्या तब्बल १० हजार समाजबांधवांच्या घरांमध्ये ती मोफत (Free Distribution) पोहोचवली जाते.

मान्यवरांची उपस्थिती या प्रकाशन सोहळ्यासाठी समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती आणि मान्यवर उपस्थित होते. यामध्ये ज्येष्ठ उद्योजक प्रसन्नशेठ आंबूलकर, संघाचे अध्यक्ष राजीव कीर, जाहिरातदार सौ. साक्षी गणेश धुरी, श्री. उदय नागवेकर, श्री. दिलीप रेडकर सर, निखिलशेठ बोरकर, स्वप्नीलशेठ सुर्वे यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच कार्यक्रमाला सौ. दयाताई चवंडे, अमृता मायनाक, भैरी देवस्थानचे विश्वस्त विजय खेडेकर, चंद्रकांत खेडेकर, अविनाश गवंडे, मुकुंद विलणकर, संतोष चव्हाण, सुरेंद्र घुडे, विजय बिर्जे, उदय हातीसकर, दिलीप भाटकर, प्रशांत मयेकर, आर. के. विलणकर, गजानन लाड, काका तोडणकर, सुहास धामणस्कर, दीपक तिवरेकर, श्री. मोरे आणि कार्यालय प्रमुख कु. मयेकर उपस्थित होते.

समाजाला जोडणारा दुवा भंडारी दिनदर्शिका ही केवळ तारीख आणि वार पाहण्याचे साधन नसून, ती समाजाला एकत्र बांधून ठेवणारा एक महत्त्वाचा दुवा बनली आहे. १० हजार घरांपर्यंत हा ‘सामाजिक ठेवा’ पोहोचवण्यासाठी समाज संघ आणि जाहिरातदारांनी घेतलेल्या मेहनतीचे यावेळी कौतुक करण्यात आले. भैरी चरणी नतमस्तक होऊन या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रार्थना करण्यात आली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:25 PM 08/Dec/2025