कारवाईसाठी राजापूरचे उपविभागीय अधिकारी (SDO) आणि पोलिसांकडे प्रकल्पग्रस्तांचे निवेदन
राजापूर :
Jamda Project Land Trespassing News अंतर्गत काजिर्डा येथील प्रस्तावित जामदा मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेला गती मिळत असतानाच, प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीवर अनधिकृतपणे प्रवेश करून झाडांची नासधूस केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संबंधित दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन सोमवारी राजापूरचे उपविभागीय अधिकारी (SDO) आणि राजापूर पोलिसांना देण्यात आले आहे.
१ ऑक्टोबर रोजी अनधिकृत प्रवेश अन् नासधूस
निवेदनातील माहितीनुसार, १ ऑक्टोबर रोजी दुपारी २ ते ५ या कालावधीत चार व्यक्तींनी ब्राम्हणखोरे पुनर्वसन गावठाण क्षेत्रात अनधिकृत प्रवेश केला. त्यांनी शासकीय जमिनीसोबतच प्रकल्पग्रस्तांनी शासनाला देऊ केलेल्या खाजगी जमिनींमध्येही प्रवेश करून झाडांची मोठ्या प्रमाणावर नासधूस केली. या प्रकारामुळे शासन आणि प्रकल्पग्रस्त शेतकरी दोघांचेही मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तक्रारीत संबंधित चारही व्यक्तींची नावे नमूद करण्यात आली आहेत.
२०२ हेक्टरपैकी ७५ हेक्टरची संयुक्त मोजणी पूर्ण
जामदा प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील भूसंपादनाची प्रक्रिया यापूर्वी रखडली होती. त्यानंतर २०२५-२६ मध्ये काजिर्डा येथील प्रकल्पग्रस्त व भूमीपुत्रांनी प्रशासनाशी संवाद साधून गैरसमज दूर केले आणि जमीन देण्याची भूमिका घेतली.
बुडीत क्षेत्रातील २०२ हेक्टर क्षेत्रासाठी शासनाने अधिसूचना जारी केली आहे.
कार्यकारी अभियंता (पाटबंधारे विभाग, कापसाळ-चिपळूण) यांनी मोजणी शुल्क भरल्यानंतर प्रकल्पग्रस्तांच्या सहकार्याने ७५ हेक्टर क्षेत्राची संयुक्त मोजणी पूर्ण झाली आहे.
या क्षेत्राच्या थेट खरेदी प्रस्तावाच्या अनुषंगाने राजापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे.
पुनर्वसनासाठी स्थानिकांनी दिली हक्काची जमीन
प्रकल्पातील बुडीत क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी ‘मौज मूर’ येथे ‘मूर सांडवा गावठाण’ शासनाने संपादित केले आहे. तसेच काजिर्डा येथे ‘ब्राह्मणखोरे पुनर्वसन गावठाण’ उभारण्यासाठी सुमारे २६ हेक्टर क्षेत्राच्या संपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यातील काही क्षेत्र शासनाने थेट खरेदी केले असून काही क्षेत्रासाठी बयाणा रक्कम देऊन साठेखत करण्यात आले आहे.
“पुनर्वसनासाठी आम्ही आमची हक्काची जागा शासनाला दिली आहे, त्यामुळे आमच्या जमिनीत अनधिकृत प्रवेश करून नुकसान करणाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे”, अशी स्पष्ट भूमिका प्रकल्पग्रस्तांनी मांडली आहे.
सोशल मीडिया पोस्ट आणि स्थानिक भूमीपुत्रांना त्रासाचा आरोप
काही व्यक्ती सोशल मीडियावर प्रकल्पग्रस्तांची बदनामी करणाऱ्या पोस्ट टाकत असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे. तसेच, संबंधित व्यक्तींचा काजिर्डा किंवा ब्राह्मणखोरे पुनर्वसन गावठाणातील जमिनींशी कायदेशीर हक्कसंबंध नसतानाही स्थानिकांना विनाकारण त्रास दिला जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून कामात अडथळा आणणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर सुनीता बाबाजी मोरे, आनंदा बापू आर्डे, विराज चंद्रकांत आर्डे, राजेंद्र बापू आर्डे, सीताराम अंतू आर्डे, कृष्णा दगडू आर्डे, अश्विनी विनायक पवार, मनीषा तुळशीराम पाटेकर, मेघना मोरे यांच्यासह सुमारे ३५ ते ४० स्थानिक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:12 07-10-2026














