रत्नागिरी, दापोली, चिपळूण, खेड बसस्थानकाचे तिसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षण

रत्नागिरी : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान राज्यात सुरू आहे. पहिले, दुसऱ्या फेरीचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, तिसऱ्या सर्वेक्षणास प्रारंभझाले आहे. १० ते २१ नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्यातील अ, ब, क वर्गातील रत्नागिरी, पाली, दापोली, खेड आणि चिपळूण बसस्थानकाची पाहणी कमिटीच्या सदस्यांनी केली असून, उर्वरित बसस्थानकांची पाहणी होणार आहे. त्यानंतर अंतिम गुणांकन जाहीर होणार असल्याचे सांगण्यात आले.

सर्वसामान्य प्रवाशांना स्वच्छ आणि सुंदर बसस्थानक आहे का हे पाहण्यासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त वर्षभर राज्यभरातील एसटीच्या सर्व बसस्थानकावर स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियान सुरू झाले आहे. पहिल्या सर्वेक्षणात रत्नागिरीस अ मानांकन मिळाले, दुसऱ्या टप्प्यात रत्नागिरी नवीन, रत्नागिरी रहाटाघर, खेड, चिपळूण बसस्थानकासही अ मानांकन मिळाले, उर्वरित बसस्थानकास ब, क मानांकन मिळाले होते.

दरम्यान, आता तिसऱ्या सर्वेक्षणास सुरुवात झाली आहे. ब, क वर्गाच्या बसस्थानकासाठी कोल्हापूर विभागाची समिती १० ते २१ नोव्हेंबर दरम्यान दापोली बसस्थानकाची पाहणी केली. यावेळी कोल्हापूर विभाग यंत्र अभियंता यशवंत कांतोडे, विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी गीतांजली सूर्यवंशी या कमिटीने पाहणी करून गुणांकन केले.

तसेच अ वर्गासाठी याच कालावधीत रत्नागिरी, खेड, चिपळूण बसस्थानकाची पाहणी नागपूर प्रदेश नियंत्रण समितीचे व्यवस्थापक श्रीकांत गभणे, वरिष्ठ सांख्यिकी अधिकारी किशोर आदमने यांनी केली. यावेळी बसस्थानकाची स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सोय, सीसीटीव्ही, स्वच्छतागृह, उपहारगृह याचीही पाहणी केली. तसेच एसटी बसेस वेळेवर सुटतात का, स्वच्छता यासंदर्भात काही प्रवाशांशी समितीने चर्चा केली आहे.

स्वच्छ व सुंदर बसस्थानकासाठी रत्नागिरी विभागात दोन सर्वेक्षण झाली आहेत. तिसऱ्या फेरीचे सर्वेक्षण नोव्हेंबर महिन्यात झाले. रत्नागिरी, चिपळूण, खेड, दापोली, पाली अशा अ, ब आणि क वर्गातील बसस्थानकाची पाहणी कमिटीनी केली आहे. यानंतर उर्वरित बसस्थानकाची पाहणी होईल. त्यानंतर अंतिम गुणांकन जाहीर होणार आहे-प्रज्ञेश बोरसे, विभाग नियंत्रक, रत्नागिरी

अंतिम गुणांकनानंतर कोटी, लाखांची बक्षिसे मिळणार
स्वच्छ बस्थानकाची एकूण तीन सर्वेक्षण झाल्यानंतर अंतिम गुणांकन जाहीर करण्यात येणार आहे. या अभियानात ३ कोटींचे बक्षीस देण्यात येणार आहे. अ मानांकन असलेल्या बसस्थानकास १ कोटी, व वर्गासाठी ५० लाख, तर क वर्गासाठी २५ लाखांचे बक्षीस देण्यात येणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:24 PM 09/Dec/2025