रत्नागिरी : लांब पल्ला असो वा ग्रामीण मार्गवरील एसटी बंद पडली तर मागून येणाऱ्या कोणत्याही बसमधून प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. वातानुकूलित, निमआराम, आरामबसमधून प्रवाशांना विनाशुल्क व तातडीने प्रवासाचा पर्याय उपलब्ध करून देणे बंधनकारक केले आहे.
शिवशाही, ई-शिवाई, शिवनेरी या बसमध्ये प्रवाशांचा प्रवेश नाकारल्यास किंवा तिकिटाच्या फरकाच्या पैशासाठी अडवणूक केल्यास संबंधित वाहक-चालकांवर कठोर कारवाई करण्याची सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. प्रवाशांसाठी परिवहन मंत्र्यांचा निर्णय स्वागतार्ह आहे.
लांब किंवा ग्रामीण मार्गावर प्रवास करत असताना बस अचानक बंद पडली तर प्रवाशांना ताटकळत तासन् तास बसावे लागते. अनेकवेळा निर्मनुष्य, आडवळणावर एसटी बंद पडते. अशावेळी महिला, वयोवृद्ध, मुले एकूणच प्रवाशांचे हाल होतात. पर्यायी बसा उपलब्ध होत नाही, शिवाय अनेक बसेसा जागा नाही सांगून प्रवाशांना बसमध्ये घेण्याचे टाळतात. त्यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय पाहता परिवहन मंत्री सरनाईक यांचा निर्णय प्रवाशांसाठी फायदेशीर ठरणार आहे.
कोणत्याही मागून येणाऱ्या बसमध्ये प्रवासाची मुभा
राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस नादुरुस्त झाली किंवा अपघात झाल्यास प्रवाशांना त्याच मार्गावर धावणाऱ्या अन्य एसटी बस तसेच उच्च श्रेणी किंवा वातानुकूलित बसमधून त्याच तिकिटात प्रवास करता येणार आहे.
विनाशुल्क, तातडीने पर्याय देणे बंधनकारक
प्रवासादरम्यान एसटी बिघडल्यास त्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विनाशुल्क, तातडीने पर्याय उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे.
शिवशाहीत प्रवेश नाकारल्याच्या तक्रारी
ऐन प्रवास बस बंद पडली तर मागून येणाऱ्या शिवशाहीमध्ये प्रवाशांचा प्रवास नाकारला जातो.
भाडे फरकाच्या पैशांची केली जाते मागणी
प्रवासात साधी गाडी बंद पडली व शिवशाही किंवा शिवाई बसमध्ये प्रवाशांना घेताना प्रवाशांकडून मूळ तिकिटावरील फरकाची रक्कम मागितली जाते.
…तर वाहक-चालकांवर होणार कारवाई
प्रवासात बस बंद पडली व दरम्यान दुसऱ्या बसच्या चालक-वाहकांनी प्रवाशांना बसमध्ये घेणे नाकारल्यास थेट कारवाईची सूचना केली आहे
एसटी बंद पडल्यास प्रवास कसा करायचा?
अनेकवेळा एसटीने प्रवास करताना काहीवेळा तांत्रिक कारणामुळे बसेस बंद पडतात किंवा नादुरुस्त होतात. निर्मनुष्य ठिकाणी किंवा आडवळणात बंद पडतात. त्यामुळे चोरी किंवा लूटमारीचा धोका असल्याने या मार्गावरून धावणाऱ्या अन्य कोणत्याही एसटी बसमध्ये प्रवाशांना प्रवेश देणे बंधनकारक केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:00 PM 06/Jan/2026














