उद्धव ठाकरेंना मराठी माणसाचे नाही तर मोदींच्या विरोधकांचे मतदान : राज ठाकरे

Jun 13, 2024 - 14:05
 0
उद्धव ठाकरेंना मराठी माणसाचे नाही तर मोदींच्या विरोधकांचे मतदान : राज ठाकरे

मुंबई : लोकसभेच्या निकालानंतर राज्यात सगळेच पक्ष विधानभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. महाविकास आघाडीतील पक्षांनी विधानसभा निवडणूक एकत्र लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

दुसरीकडे महायुतीतील मित्रपक्षांचा अद्याप निर्णय झालेला नाही. अशात लोकसभेला नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्यासाठी चाचपणी सुरु केली आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात पदाधिकाऱ्यांची बैठक घेत विधानसभेसाठी कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत.

विधानसभा निवडणूक आणि संघटनात्मक बांधणीच्या दृष्टीने राज ठाकरे यांनी बैठकी बोलवली होती. या बैठकीत विधानसभा निवडणुकीसाठी आपण २०० ते २५० जागांवर तयारी करतोय असं राज ठाकरे यानी म्हटलं आहे. तसेच उद्धव ठाकरेंना लोकसभा निवडणुकीत झालेलं मतदान हे मराठी माणसांचे नसल्याची भूमिका राज ठाकरे यांनी बैठकीत मांडल्याचे म्हटलं जात आहे. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुका आणि अनेक महत्त्वाच्या विषयांवर भाष्य केलं.

काय म्हणाले राज ठाकरे?

"आपण २०० ते २२५ जागांवर विधानसभा निवडणूक लढतो आहोत. विधानसभेच्या तयारीला लागा. मी कोणाच्याही पुढे जागावाटपाची चर्चा करायला जाणार नाही. कुठल्याच पक्षाचा जागांचा फॉर्म्युला ठरलेला नाही. त्यामुळे आपल्या पक्षाची भूमिका काय आहे हेच तुम्हाला सांगायचे आहे," असे राज ठाकरे यांनी म्हटल्याचे म्हटलं आहे.

यावेळी राज ठाकरे यांनी लोकसभेच्या निकालाबाबतही भाष्य केले. "लोकसभेमध्ये उद्धव ठाकरे आणि त्यांच्या महाविकास आघाडीला झालेलं मतदान हे मराठी माणसाचे नाही. मराठी माणूस आपण रिंगणात कधी उतरतो आहे याची वाट बघत आहे. उद्धव ठाकरेंना झालेले मतदान हे मोदी यांच्या विरोधातील होतं," असेही राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सांगितल्याचे म्हटलं.

शपथविधीला निमंत्रण न मिळाल्यानं मनसेमध्ये नाराजी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यात महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यानंतर राज ठाकरे यांनी महायुतीच्या लोकसभेच्या उमेदवारांसाठी सभा घेऊन विजयी करण्याचे आवाहन केले होते. राज ठाकरे यांनी प्रचार केलेल्या उमेदवारांचा विजय देखील झाला. मात्र त्यानंतर पंतप्रधान मोदींच्या शपथविधी सोहळ्यांला राज ठाकरे यांना निमंत्रित करण्यात आले नाही. यामुळे मनसे नेत्यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली. भाजपने यावर सारवासारव करताना घाईमध्ये निमंत्रण द्यायचे राहून गेलं असं उत्तर दिलं होतं.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:30 13-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow