मुंबईतील टूर ऑपरेटरने लावला रत्नागिरीतील अनेकांना लाखो रुपयांचा चुना

Jun 17, 2024 - 17:57
 0
मुंबईतील टूर ऑपरेटरने लावला रत्नागिरीतील अनेकांना लाखो रुपयांचा चुना

रत्नागिरी : मुंबईतील एका शर्मा नामक टूर ऑपरेटरने रत्नागिरीतील अनेकांना लाखो रुपयांचा चुना लावल्याची चर्चा आता रत्नागिरीत दबक्या आवाजात सुरु आहे. सिंगापूर, तुर्की आदी इंटरनॅशनल टूरची प्याकेज विकून या टूर ऑपरेटरने रत्नागिरीतील राजकीय व्यक्तींपासून अनेकांना फसवल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. परदेशात गेल्यावर हॉटेल बुकिंग आणि विमानाची तिकिटे देखील खोटी असल्याचे लक्षात आल्यावर आपली झालेली फसवणूक यातील काहींच्या लक्षात आली आहे. तर अनेकांनी याच ऑपरेटर कडून तुर्की सफरीचे बुकिंग केले आहे. सध्या या टूर ऑपरेटरचा फोन बंद असून त्याने दिलेल्या पत्यावर मुंबईत त्याचे ऑफिस देखील नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नेहमीच्या टूर ऑपरेटर पेक्षा सुमारे १० हजार रुपयांनी कमी बजेट देणाऱ्या शर्मा नामक व्यक्तीने रत्नागिरीतील अनेकांना सिंगापूर मलेशियाच्या टूर वर नेले. भारतातून सिंगापूरला जाणारे विमानाचे तिकीट वगळता सर्वकाही यात बोगस होते. हि मंडळी हॉटेलला पोहचल्यावर तेथे बुकिंग नसल्याचे लक्षात आले. शिवाय परतीची विमानाची तिकिटे देखील बोगस असल्याचे उघडकीस आले. अखेर सर्वांना आपल्या पदरचे आणखी सुमारे दीड लाख रुपये मोजून परदेश सफर करावी लागली. परदेश सफरीत खर्चासाठी लागणारे डॉलर देखील स्वस्तात देतो असे सांगत या टूर ऑपरेटरने लाखो रुपये या प्रवाशांकडून आधीच उकळले होते. कन्व्हर्ट केलेले डॉलर्स हॉटेलमध्ये मिळतील असे सर्वांना सांगितले होते. मात्र हॉटेल बुकिंगच बोगस निघाल्याने आपली फसगत झाल्याचे साऱ्यांच्या लक्षात आले. 
याच टूर ऑपरेटर कडून अजूनही अनेकांनी बुकिंग केले असल्याचे बोलले जात आहे. सध्या या टूर ऑपरेटरचा फोन देखील बंद आहे. एका २० जणांच्या ग्रुपने देखील लाखो रुपये देऊन तुर्की सफरीचे याच ऑपरेटरकडे बुकिंग केले असून या सर्वांना देण्यात आलेली विमानाची तिकिटे देखील बोगस असल्याचे आता बोलले जात आहे. 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow