राजापूर-चिखलगाव मार्गावर चिखलाचे साम्राज्य

Jun 14, 2024 - 11:53
 0
राजापूर-चिखलगाव मार्गावर चिखलाचे साम्राज्य

रत्नागिरी : सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळ्याच्या तोंडावर हाती घेतलेल्या राजापूर चिखलगाव मार्गावरील मोरीच्या कामामुळे शीळ, गोठणे दोनिवडे-चिखलगाव भागातील ग्रामस्थांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चिखल आणि माती साचलेली आहे. काही प्रमाणात मोरी खचली असून दलदल झाली आहे. त्यातून मार्ग काढताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

शीळ-गोठणेदोनिवडे-चिखलगाव रस्त्यावर कायम वाहनांची रहदारी असते. हा मार्ग अर्जुना नदी किनाऱ्यावरून जातो. पुलानजीक शीळ आणि राजापूरच्या हद्दीवर असणारी सखल मोरी पाण्याखाली जाते आणि पावसाळ्यात बंद होते. ही मोरी एका बाजूने खचल्याने अपघात होण्याचा धोका निर्माण झाला होता. त्यामुळे या मोरीची दुरुस्ती करताना उंची वाढवण्याची मागणी ग्रामस्थांमधून केली जात होती. त्याप्रमाणे दोन वर्षांपूर्वी शासनाने ५० लाखाचा निधी मंजूर केला; मात्र हे काम दोन वर्षे रखडले. ग्रामस्थांनी आवाज उठवल्यानंतर मोरीचे काम ऐन पावसाळ्याच्या तोंडावर सुरू करण्यात आले. चुकीच्या पद्धतीने हे काम सुरू असल्याचे ग्रामस्थांनी बांधकाम विभागाच्या निदर्शनास आणून दिले होते; मात्र त्यांच्याकडून दुर्लक्ष करण्यात आले.

या रस्त्याला नव्याने करण्यात आलेल्या संरक्षण भिंतीला समांतर मोरी घालणे आवश्यक असताना धोकादायक पद्धतीने मोरी घालण्यात आली आहे. मुळात मोरी ही अवघड आणि धोकादायक वळणात असताना हे वळण कमी करून अपघाताचा धोका कमी करण्याऐवजी त्रिकोणी वळण करून अपघातास निमंत्रण देणारी ठरल्याचे बोलले जात आहे. यावर तत्काळ उपाययोजना व्हाव्यात, अशी मागणी केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:22 14-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow