रत्नागिरी : जिल्ह्यात १ हजार ७३२ हेक्टरवर भातपेरण्या पूर्ण

Jun 14, 2024 - 17:05
Jun 14, 2024 - 17:05
 0
रत्नागिरी : जिल्ह्यात १ हजार ७३२ हेक्टरवर भातपेरण्या पूर्ण

रत्नागिरी : जूनच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात १६३ मिमी सरासरी पाऊस झाला आहे. त्यामुळे भातशेतीच्या कामांना प्रारंभ झाला आहे. गतवर्षीच्या नोंदणीनुसार जिल्ह्यात भाताचे सरासरी क्षेत्र ५८ हजार हेक्टर आहे. त्यातील दहा टक्के क्षेत्रावर म्हणजेच सहा हजार हेक्टर क्षेत्रावर भातपेरणी करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात तयारी सुरू झाली असून. आतापर्यंत १ हजार ७३२ हेक्टरवर भात रोपवाटिकेसाठी पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत.

 खरीप हंगामासाठी कृषी विभाग सज्ज झाला आहे. अधिकारी कृषी सेवा केंद्रांना भेटी देऊन दुकानात उपलब्ध बियाणे व खते याची माहिती घेत आहेत. दर आणि उपलब्ध माल याची माहिती दुकानाबाहेर फलकावर लावण्याच्या सूचना कृषी विभागाकडून दिल्या आहेत. बियाणे व खतांची विक्री योग्य किमतीत होत आहे की नाही, याची खात्री केली जात आहे त्यासाठी जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय भरारी पथके स्थापन केली आहेत. शेतीसाठी जिल्ह्याला युरिया ५ हजार मेट्रिक टन, एनपीके २५०० मेट्रिक टन, एसएसपी ३५२ मे. टन एवढे खत उपलब्ध आहे. जिल्हा कृषी विकास अधिकारी अजय शेंडे यांच्यासह अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी रत्नागिरी येथील रेल्वे रेक केंद्राला भेट देऊन पाहणी केली. शेतकऱ्यांसाठी ५५०० क्विंटल बियाणे मागणी केले होते. आतापर्यंत ४२०० क्विंटल पुरवठा झाला आहे. बियाणे मुबलक प्रमाणात प्राप्त झाले असून, शेतकऱ्यांना बांधावर भातबियाणे वितरित करण्यात आले आहे. युरियाची टंचाई भासू नये म्हणून महाराष्ट्र कृषी औद्योगिक विकास महामंडळामार्फत ७६० टन युरिया बफरसाठा करण्यात आला आहे.

जिल्ह्यात मॉन्सूनचे आगमन झालेले असले तरीही अपेक्षित जोर नाही; मात्र भातपेरणीसाठी झालेला पाऊस पुरेसा असल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे. त्यानुसार पाणी उपलब्ध असलेल्या ठिकाणी पेरणी करण्यास सुरवात झाली आहे. गतवर्षी महसूल विभागाकडून झालेल्या ऑनलाईन पीकनोंदीनुसार भात लागवडीखालील क्षेत्र ५८ हजारइतकेच नोंदले गेले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:23 PM 14/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow