शाळेची घंटा आजपासून वाजणार !

Jun 15, 2024 - 10:07
Jun 15, 2024 - 10:14
 0
शाळेची घंटा आजपासून वाजणार !

रत्नागिरी : मे महिना संपून जून महिना सुरू झाला की, शालेय  विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू होण्याचे वेध लागतात. मामाच्या गावाला सुट्टी साजरी करण्यासाठी गेलेले बालगोपाळांना शाळा सुरू होणार म्हटल्यावर परतीच्या प्रवासाची ओढ लागलेली असते, नवीन वर्ग, नवीन शिक्षक आणि नवीन मित्र, नवीन अभ्यास याची उत्सुकता विद्यार्थ्यांच्या मनात राहून जाते. अभ्यासाबरोबर शिक्षक बदलतील का, नवीन शिक्षक कसे असतील, आपले जुने मित्र असतील का, त्यांनी शाळा तर बदलली नसेल ना, अशा अनेक प्रश्नांची सरमिसळ डोक्यात घोळत असते. आता या सर्व प्रश्नांची उत्तरे शनिवारी मिळणार असून आजपासून शाळेची घंटा वाजणार आहे.

नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत आहे. जिल्हा परिषदच्या २ हजार ५०० शाळांची घंटा आजपासून वाजणार आहे. त्यासाठी शाळांकडून तयारी करण्यात येत आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी  विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शाळांमधून शाळापूर्व तयारी कामाला वेग आला आहे. शुक्रवारी सायंकाळपर्यंत अनेक शाळांमध्ये नवीन प्रवेश, शाळा स्वच्छता, वर्ग स्वछता, परिसर आकर्षक बनविण्यासाठी परिसरातील शाळातील शिक्षकांची आणि प्रशासनाची लगबग सुरू होती. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके, गणवेश, गोड मिष्टान्त्र, खाऊ वाटप केले जाणार आहे. पहिल्या दिवशी वैज्ञानिक शास्त्रांची जयंती साजरी करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्याअनुषंगाने शास्त्रज्ञांची फोटो ओळख, माहिती, प्रभातफेरी काढून संविधानाची मूलभूत कर्तव्य, जनजागृती फेरी काढण्यासाठी गटविकास अधिकारी यांच्या वतीने सांगण्यात आले आहे. त्याप्रमाणे शाळा स्तरावर राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

बालकांना कधी एकदा शाळेत जातोय आणि सुट्टीतील आनंद आपल्या मित्र-मैत्रीणींना सांगतो, असे झाले आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार विद्यार्थी स्वागत करण्यासाठी शाळा तयारी करत आहेत. महिनाभर शांत असणाऱ्याचा शाळेत कधी एकदा घंटा वाजते आणि सारा परिसर पुन्हा गजबजून जातो, असेच झाले आहे.

जिल्ह्यात पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके मिळणार आहेत. मात्र गणवेशाचे तीनतेरा वाजले आहेत. पहिली ते आठवीपर्यंतच्या १ लाख ४ हजार विद्यार्थ्यांना ही मोफत पाठ्यपुस्तके वितरीत केली जाणार आहेत. ही सर्व पुस्तके शाळा स्तरावर पोहोच झाली आहेत. तसेच यावर्षी पहिलीच्या वर्गात १० हजार ५७१ मुले प्रवेश घेणार आहेत. ही मुले प्राथमिक शिक्षणाचा श्रीगणेशा करणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:34 AM 15/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow