चिपळूणात कोकणस्तरीय 'नदी की पाठशाला' कार्यशाळेचे आयोजन

Jun 17, 2024 - 17:21
Jun 17, 2024 - 17:23
 0
चिपळूणात कोकणस्तरीय 'नदी की पाठशाला' कार्यशाळेचे आयोजन

चिपळूण : 'चला जाणूया नदीला' आणि जलबिरादरी यांच्यावतीने कोकण विभागासाठी चिपळूण येथे २१ ते २३ जून या कालावधीत 'नदी की पाठशाला' या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. डीबीजे महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये तीन दिवस ही कार्यशाळा होणार आहे.

जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार व चिपळूण न.प.चे मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा होणार आहे.

२१ जून रोजी सकाळी १० वा. जलपूजनाने कार्यशाळेचे उद्घाटन होईल. त्यानंतर चिपळूण आणि कोकणातील समस्या व स्वरूप या बाबत मांडणी होईल. ११ वा. डॉ. श्रीनिवास वडगबाळकर हे 'कोकणातील नद्यांची भूरचना' या विषयावर मार्गदर्शन करतील. त्यानंतर जीवित नदी पुणेच्या संस्थापक शैलजा देशपांडे 'कोकणातील नद्या कशा समजून घ्याव्यात' या विषयी बोलतील. त्यानंतर १२ वा. जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता 'पुराची संभाव्य कारणे' या विषयी मार्गदर्शन करतील. दु. २ वा. पूर निसर्गनिर्मित की मानवनिर्मित या विषयावरील चर्चासत्रात कर्नल सुपनेकर, डॉ. अजित गोखले, शाहनवाज शाह, मुख्याधिकारी विशाल भोसले हे सहभाग घेतील. दु. ३ वा. प्रदूषण या विषयावर कोल्हापूर येथील उदय गायकवाड मार्गदर्शन करतील. सायंकाळी ४ वा. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी प्रदूषण कसे मोजाल या विषयी बोलतील, सायंकाळी ५ वा. 'सांडपाणी आणि रासायनिक प्रदूषण व्यवस्थापन' या विषयी डॉ. अजित गोखले, अरविंद म्हात्रे मार्गदर्शन करतील. 

२२ जून रोजी सकाळी ६ वा. नदीभेट कार्यक्रम होईल. दु. १ वा. लोटे येथील औद्योगिक संस्थेला भेट, सायंकाळी ५ वा. क्षेत्रभेटीवर चर्चा, २३ रोजी सकाळी ८ वा. लोकसंवाद, यानंतर कोकणातील कोंडी या विषयी डॉ. सुमंत पांडे, डॉ. अजित गोखले आणि युयुत्सू आर्ते हे मार्गदर्शन करणार आहेत. सकाळी १० वा. 'नदी की पाठशाला आणि पुढील दिशा' या विषयी चर्चासत्र, स. ११.३० वा. पूर आणि प्रदूषण यांची तीव्रता कमी करण्यासाठी प्रशासन आणि लोकसहभाग या विषयी चर्चासत्र होईल, दु. १ वा. 'नदीचे आरोग्य आणि मानवी आरोग्य यांचा संबंध' या बाबत जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह मार्गदर्शन करतील. दु. २.३० वा. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे मार्गदर्शन होईल. सायंकाळी ४ वा. प्रमाणपत्र वितरण व समारोप होईल.

सहभागाचे आवाहन...
नदी की पाठशाला या कार्यशाळेमध्ये कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील नदी या विषयावरील तज्ज्ञ अभ्यासक, महाविद्यालयीन युवक हे सहभाग घेऊ शकतात. या कार्यशाळेत प्रवेश घेण्यासाठी गुगल लिंकद्वारे फॉर्म भरावा, असे आवाहन मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी केले आहे. ही लिंक पुढीलप्रमाणे आहे. https://forms.gle/UxqZTKS8q3gR9dqZA

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
05:47 PM 17/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow