जि. प. शाळेच्या विद्यार्थ्यांची दगडी पाटी कालबाह्य..

Jun 18, 2024 - 11:19
Jun 18, 2024 - 16:21
 0
जि. प. शाळेच्या विद्यार्थ्यांची दगडी पाटी कालबाह्य..

गुहागर : आताची शिक्षण पद्धती आणि पूर्वीची शिक्षण पद्धती यात खूप फरक झाला आहे. अंगणवाडीतून जेव्हा बालक प्राथमिक शाळेची पायरी बढत असे तेव्हा विद्यार्थी आपल्या आयुष्याच्या शैक्षणिक श्रीगणेशा दगडी पाटीवर करीत असे. यावेळी त्याच्यासोबत दप्तरामध्ये एक अंकलिपी, दगडी पाटी पेन्सिल आणि लाकडी पट्टी असायची. या दगडी पाटीवर तो मुळाक्षरे गिरवत असे. दगडी पाटी जीवापाड जपणाऱ्या पिढीला आजही दगडी पाटीची आठवण नक्कीच येते. तेव्हा बालपणाचा काळ सुखाचा या ओळी आठवतात. मात्र आता पाटीकडून टॅबकडे वेगाने प्रवास करणारी नवी शिक्षण प्रणाली दिसून येत आहे. यामध्ये दगडी पाटी नामशेष होताना दिसते.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशातील सर्व राज्यांमध्ये शिक्षणाची चळवळ जोमाने सुरू झाली. मात्र त्यावेळी इतक्या शैक्षणिक सुविधा नव्हत्या. शाळांचे प्रमाण कमी होते. शाळांसाठी आतासारख्या भव्य इमारती सुद्धा नव्हत्या. काहीवेळा जागे अभावी शाळा कुणाच्या तरी घरी किंवा जनावरांच्या गोठ्यातही चालवल्या जात असत. मात्र शिक्षणाविषयी लोकांच्या मनामध्ये एक वेगळीच आस्था त्याकाळी होती. शिक्षण आणि त्यावेळचे शिक्षक या दोघांच्या प्रति असलेला आदरभाव यातूनच चांगले विद्यार्थी घडत असत.

त्यावेळची शिक्षण पद्धती आणि आताची शिक्षण पद्धती यामध्ये खूपच फरक दिसून येतो. त्याकाळी चार ते पाच वर्गखोल्या असणाऱ्या लांबलचक कौलारू इमारती आणि पुढे पटांगण असे शाळेचे चित्र होते. या शाळेमध्ये जेव्हा विद्यार्थी इयत्ता पहिलीला प्रवेश घ्यायचा तेव्हा त्याच्या पाठीवर आतासारखी फॅशनेबल स्कूल बंग नव्हती. त्यांच्या पाठीवर कापडी पिशवी त्या पिशवीमध्ये दगडी पाटी, पेन्सिल, अंकलिपी एखादे पुस्तक आणि एक लाकडी पट्टी असे. दगडी पाटी त्यावेळी प्रत्येक किराणा दुकानांमध्ये समोर लटकलेली असायची. मे महिना संपता संपता प्रत्येक पालक आपल्या मुलासाठी ती दगडी पाटी विकत घेत असत. इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत प्रत्येक मुलाला ही पाटी आणि पेन्सिल उपयुक्त ठरत होती; मात्र ही पाटी आपल्या कापडी पिशवीत ठेवून जमिनीवर त्यांना बसावं लागत असे.

आतासारखे बसण्यासाठी बॅच त्यावेळी नव्हते. जुनी शिक्षण पद्धती आणि त्यातील ही पाटी आजही त्या काळातील विद्यार्थ्यांना नक्की आठवते. मात्र आताच्या शिक्षण पद्धतीमध्ये कमालीचा बदल झाला आहे. आता पाटीकडून विद्यार्थी टॅबकडे वळले आहेत. नव्या शिक्षण पद्धतीत विद्यार्थी टॅबच्या आधारे अभ्यास करताना दिसून येतात.

सरस्वती पूजन.... शाळेत सरस्वती पूजन ज्या दिवशी असायचे त्या दिवशी प्रत्येक विद्यार्थी याच दगडी पाटीला घरी जाऊन कोळशाने उगळून घासून तिला स्वच्छ करत असे. त्यानंतर तिचे पूजन करण्यासाठी शाळेत सरस्वती पूजनच्या दिनी घेऊन येत असे. इतका त्याकाळी या पाटीला मान होता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:45 PM 18/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow