संगमेश्वर तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा बंद

Jun 19, 2024 - 09:46
 0
संगमेश्वर तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा बंद

देवरुख : पावसाळा सुरू झाल्यामुळे उन्हाळ्यातील भीषण पाणीटंचाई समाप्त झाली असून, संगमेश्वर तालुक्यातील पाण्याचे टँकर बंद करण्यात आले आहेत. पाऊस सुरू होण्यापूर्वी संगमेश्वर तालुक्यात २९ गावे व ४८ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात होता.

पावसाळा वेळीच सुरू झाल्यामुळे भीषण पाणीटंचाईच्या झळा थांबल्या आहेत. तालुक्यामध्ये सुमारे ३४ गावे व ८५ वाड्यांनी टँकरची मागणी प्रशासनाकडे केली होती. प्रशासनदेखील टँकर पुरवण्यामध्ये हतबल झाले होते. एक शासकीय व दोन खासगी टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. पावसाने जून महिन्याच्या सुरुवातीलाच बरसायला सुरुवात केल्यामुळे तालुक्यात पाण्याची पातळी वाढून टंचाईच्या झळा थांबल्या. यामुळे प्रशासनाने दि. १४ पासून टँकर थांबवले.

तालुक्यात उन्हाळ्यामध्ये भीषण पाणीटंचाईची तीव्रता वाढली होती. यातच खासगी टँकर अधिक ग्रहण करण्यासाठी शासनाची मंजुरी मिळत नव्हती. यामुळे टँकरची मागणी केलेल्या गाव व वाड्यांना पाणीपुरवठा करण्यामध्ये कमतरता भासत होती. तरीही उपलब्ध असलेल्या टँकरद्वारे प्रशासनाकडून नियोजनबद्ध पाणीपुरवठा केला जात होता. यामुळे यावर्षी भीषण पाणी टंचाई भासून सुद्धा जनतेतून ओरड निर्माण झालेली दिसून आली नाही. यावर्षी तालुक्यामध्ये टंचाईग्रस्त गावांना टँकरने एक दिवस आड पाणीपुरवठा केला जात होता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:13 AM 19/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow