शरद पवार पायी वारीत सहभागी होणार, यंदाच्या 'आषाढी'ला वारकऱ्यांसोबत चालणार

Jun 19, 2024 - 14:14
 0
शरद पवार पायी वारीत सहभागी होणार, यंदाच्या 'आषाढी'ला वारकऱ्यांसोबत चालणार

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यंदाच्या आषाढी वारीत (Ashadhi Wari) सहभागी होणार आहेत. पंढरपूरला जाणाऱ्या आषाढी पालखी सोहळ्यात 'एक दिवस तरी वारी अनुभवावी' हा उपक्रम राबविला जातो.

साहित्यिक, विचारवंत, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, कलावंत यांचा या वारीत सहभाग असतो. यंदा शरद पवार या वारीत सहभागी होणार आहेत. त्यांच्या सोबत काँग्रसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार उल्हासदादा पवार , जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे वंशज ह.भ.प. बापूसाहेब महाराज देहूकर, महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी, पंढरपूर येथील कैकाडी महाराज मठाचे ह.भ.प. भारत महाराज जाधव, मार्मिक साप्ताहिकाचे संपादक मुकेश माचकर, कवी अरुण म्हात्रे, अभिव्यक्ती चॅनलचे रविंद्र पोखरकर आदी मान्यवर सहभागी होणार आहेत, अशी माहिती शामसुंदर महाराज सोन्नर यांनी दिली.

'एक दिवस तरी वारी अनुभवावी' उपक्रम 7 जुलै रोजी

'एक दिवस तरी वारी अनुभवावी' हा उपक्रम गेली दहा वर्षे राबविला जात आहे. यंदाचे अकरावे वर्ष असून शामसुंदर महाराज सोन्नर यांच्या नेतृत्वाखाली आणि शरद कदम, अविनाश पाटील, वर्षा देशपांडे, सुभाष वारे, राजाभाऊ अवसक, विशाल विमल, दत्ता पाकिरे यांच्या पुढाकाराने याचे आयोजन केले जाते. यंदा संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात 7 जुलै रोजी ही मंडळी बारामती ते सणसर हे अंतर चालणार आहेत. या उपक्रमाची माहिती देण्यासाठी शामसुंदर महाराज सोन्नर, सामाजिक कार्यकर्ते शरद कदम यांनी सोमवारी (दि. 17 जून) मुंबईतील 'सिव्हर ओक' या शरद पवार यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली.

वारीतील विचार, शिस्त, बंधूभाव, समता हा विचार ही मंडळी 'एक दिवस तरी वारी अनुभवावी' यात सहभागी होऊन दिवसभर चालून समजून घेतात. या दरम्यान दुपारच्या विसाव्यापर्यंत काही निवडक लोक आपले अनुभव कथन करतात. याची माहिती शरद कदम यांनी शरद पवार यांना दिली. "उपक्रम अत्यंत स्तूत्य असून सामाजिक एकोपा निर्माण होण्यासाठी फार महत्वाचा आहे, असे शरद पवार म्हणाले. या उपक्रमात या वर्षी मी सहभागी होईल, असेही ते म्हणाले". या उपक्रमात महाराष्ट्रातील सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

गेली पाच वर्षे संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात संविधान समता दिंडी असते. संतांनी आपल्या अभंग, ओव्या, ग्रंथातून समता, बंधूत्व, सामाजिक न्याय, स्वातंत्र्य याचा जो विचार मांडला आहे, त्यांचे प्रतिबिंब संविधानात उमटले आहे, हे संविधान कीर्तन-प्रवचनातून लोकांसमोर मांडले जाते. संविधान समता दिंडी ही पुण्यातून पंढरपुरपर्यंत जाते, अशी माहिती संविधान समता दिंडीचे चालक ह.भ.प. शामसुंदर महराज सोन्नर यांनी शरद पवार यांना दिली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:37 19-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow